विधानसभेत पराभवाचा धक्का, उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील सगळ्याच पक्षांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना ठाकरे गटासाठी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. याच अनुषंगाने मातोश्रीवर बैठका सुरू आहेत. या बैठकीत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे स्वबळाचा सूर लावला आहे.
शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली. लोकसभेत यश मिळाले तरी विधानसभा निवडणुकीत अपयश मिळाले. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकांमध्ये बहुतांश विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांचा महापालिका निवडणुकीसाठी ”एकला चलो रे” ची भूमिका पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंसमोर मांडली.
पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मातोश्रीवर घेत असलेल्या आढावा बैठकांमध्ये आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलून दाखवली. मातोश्रीवरील बैठकीत उद्धव ठाकरे सध्या संघटनात्मक आढावा घेत आहेत. ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अद्याप कुठलाही निर्णय घेतला जात नाही. या बैठकांमध्ये उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत आहेत.
उद्धव ठाकरे देणार शिवसेना शाखांना भेट
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे हे लवकरच शिवसेना शाखांना भेट देणार आहे. या शाखा भेटीत उद्धव ठाकरे हे मुंबईतील महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये निवडणूक न लढता आपली मुंबईतील ताकद दाखवण्याचे दृष्टिकोनातून स्वबळावर लढावं असं बहुतांश पदाधिकाऱ्यांचे म्हणणं आहे.
युती किंवा आघाडीमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे स्वबळावर लढल्यास आपले मोठ्या संख्येने उमेदवार महापालिका निवडणुकीत निवडून येतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी दर्शवला आहे.
विधानसभा निवडणुकीत काही जागांमध्ये काँग्रेसने आपल्या पक्षाच्या उमेदवाराचे काम न केल्याच्या तक्रारी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केल्या आहेत. काही जागांवर शेवटपर्यंत काँग्रेस आग्रही राहिल्याने शेवटपर्यंत झालेल्या जागा वाटप गोंधळाचा फटका काही ठिकाणी बसला असल्याचे उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
..तर ताकद दाखवता येईल
स्वबळावर निवडणूक लढल्यास जिंकण्याची क्षमता असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत संधी मिळू शकते. या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईत आपल्या पक्षाची ताकद दाखवता येऊ शकते, असा सूर आढावा बैठकांमध्ये उमटला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. उत्तर मुंबई, ईशान्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या आतापर्यंत बैठका झाल्या असून दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका या दोन दिवसात होणार आहेत.