Spread the love

विठ्ठल बिरंजे/महान कार्य वृत्तसेवा
नाक दाबले की तोंड उघडते, असे मानले जाते. परंतु आर्थिक नाड्या आवळल्या की भल्याभल्यांची फाटते, याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे आज झालेली पाकिस्तानची अवस्था. परंतु हे पहाण्यासाठी पाकिस्तानला जाण्याची गरज नाही, आपल्याच कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर 6 महिन्यापूर्वी झालेल्या दंगलीनंतर येथील रहिवाशी मिठालाही महाग झाले आहेत, येथीलच एका रहिवाशाने मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने हे वास्तव समोर आले आहे.

विशाळगडावरील दर्गा परिसरात झालेल्या अतिक्रमणावरुन 6 महिन्यापूर्वी मोठी दंगल घडली. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरजवळील एका वस्तीवर जमावाने हल्ला करुन मोठे नुकसान केले. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने विशाळगडावर संचारबंदी लागू करण्यात आली. गडावरील संपूर्ण पर्यटन बंद करण्यात आले. 6 महिन्यात एकही पर्यटक गडावर न फिरकल्यामुळे येथील रहिवाशांसह स्थानिक व्यावसायिकांचे अर्थकारण ठप्प झालं. पर्यटकांच्या जीवावरती रोजीरोटी चालणाऱ्या कुटूंबांचं अतोनात हाल सुरु आहेत. येथील रहिवाशी मिठालाही महाग झालेले आहेत. यातना असह्य झाल्यामुळे एका रहिवाशाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले.
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, येथील वास्तव मांडत मिठालाही महाग झालो आहोत, काहीतरी करा, अशी अर्त विनवणी केली. हे पत्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि राजकारण्यांसह अनेकांच्या नजरा विशाळगडाकडे वळल्या. या पत्रात येथील भीषण परिस्थितीची मांडणी केल्यामुळे आज जी पाकिस्तानची अवस्था झालेली आहे, याचे हुबेहूब चित्र डोळ्यासमोर रहाते.
यातून आता परिस्थिती हाताळायची असेल तर लढाई, दंगल घडविण्याची गरज नाही, तर आर्थिक नाड्या आवळल्या की काय परिस्थिती येते, हे वास्तव समोर आले. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी समतेचा विचार दिला. त्यांच्या विचारानेच यापुढे आपण वर्तन केलं पाहिजे, हेच यातून स्पष्ट होते.
कोल्हापूर जिल्ह्याने राज्य नव्हे, तर देशाला समतेचा विचार दिला. याच जिल्ह्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, सामाजिक सलोखा रहावा, या दिशेने प्रबोधन झाले तर कुणाच्याही आर्थिक नाड्या आवळल्या जाणार नाहीत, यासाठी राज्यकर्त्यांनीच सजग होण्याची गरज आहे.
पर्यटनासाठी सशर्त परवानगी
या पत्राची दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आणि संचारबंदी कांही अंशी शिथील केली. मंगळवारपासून विशाळगड परिसर पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. या निर्णयाचे पर्यटकांनी स्वागत केले असले तरी कठोर निर्णयही लावण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंतच पर्यटकांना गडावरती जाता येणार आहे. याबाबतचे आदेश शाहूवाडीचे तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी काढलेले आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव येथे संचारबंदी लावत केंबुर्णेवाडी, विशाळगड पायथा व भगवा चौक या ठिकाणी सक्त पोलीस पहारा ठेवण्यात आला होता. यामुळे ग्रामस्थांच्या उपजीविकेचे साधनच बंद झाले होते.