गोड ‘ऊसाचे’ कडू कनेक्शन समोर
कोल्हापूर/महान कार्य वृत्तसेवा
बीडची दहशत ही फक्त बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नाही तर ती कोल्हापूरपर्यंत सुद्धा पोहचली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडमधल्या दहशतीचे अनेक किस्से आता समोर येत आहे. दरम्यान असाच एक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. बीडमधील एका मुकादमाने गेल्या दोन वर्षात कोल्हापूरकरांची 50 कोटीहून अधिकची फसवणूक केलीय.
या प्रकरणी 445 गुन्हे कोल्हापुरात दाखल झालेत.ऊस टोळ्या पुरवण्यासाठी पैसे घेऊन मजूर न पाठवता मुकादमानी फसवणूक केलीय.पैसे मागायला गेल्यावर अनेकांना मारहाण करण्याच्या घटनाही घडल्या आहेत.कोल्हापुरातल्या 31 पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल असून त्याचे बीड कनेक्शन हा चर्चेचा विषय ठरलाय.बीड मधील दहशत ऊस पट्ट्यातही पाहायला मिळत आहे.
कोल्हापूरकरांवर बीडची दहशत
बीडमधील दहशतीचे प्रकार आता समोर आले असले तरी कोल्हापूरकर बीडकरांची दहशत गेल्या काही वर्षांपासून अनुभवत आहेत. ऊस तोडण्यासाठी मजूर पुरवण्यासाठी पैसे घेऊन ऊस टोळ्या न पुरवता ते पैसे हडपल्याच्या अनेक तक्रारी आता समोर येऊ लागल्या आहेत.कोल्हापुरात मोठ्या प्रमाणात बीड आणि परळीमधून ऊस तोड मजूर येतात. ऊस हंगाम सुरू होईपर्यंत ते ऊस तोड करतात त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपयांची मजुरी अगोदरच दिली जाते.
दोन वर्षात टोळ्याच न पुरवण्याचा फंडा
पूर्वी केवळ शब्दावर या टोळ्या येत होत्या मात्र गेल्या दोन वर्षात टोळ्याच न पुरवण्याचा फंडा समोर येऊ लागला आहे.या टोळ्या का आल्या नाहीत याची विचारणा करण्यासाठी गेलेल्यांना बीडमध्ये मारहाण झाली आहे.तर अनेकांचे पैसे बुडल्याने आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
बीड सरपंच हत्येत माजलेले मुकादमांचे कनेक्शन
कोल्हापुरच्या लोकप्रतिनिधींनी यावर आवाज उठवल्यानंतर गेल्यावर्षी यावर विशेष शिबीर घेऊन पोलिसांनी गुन्हे दाखल करून घेतले.यावेळी दन हजारहून अधिक मुकादमांनी फसवणूक केल्याचे उघड झाले असून 445 गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान फसवणूक करण्यात देशमुख प्रकरणात आरोपी असलेल्यांशी कनेक्शन असून या प्रकरणाचा तपास त्या दिशेने करण्याची मागणी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केलीय.तर हे गुन्हे फौजदारी स्वरूपाचे करण्याची मागणी त्यांनी केलीय.
पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची फसवणूक
केवळ कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची फसवणूक बीडमधल्या मुकादमाने केली आहे. त्यामुळे बीडच्या दहशतीचा हा नवा मुद्दा आता समोर येऊ लागला आहे.