तिबेट/महान कार्य वृत्तसेवा
तिबेटमध्ये झिजांग प्रांतातील शिगाजे शहरातील डिंगरी काउंटीत स्थानिक वेळेनुसार सकाळी नऊ वाजून पाच मिनिटांनी तर भारतीय वेळेनुसार सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी 7.1 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे नेपाळ आणि भारतातही जाणवले. भूकंपामुळे तिबेटमध्ये आतापर्यंत 53 जणांचा मृत्यू झाला असून 62 जण जखमी झाले आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त होत आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली दहा किमी. आतमध्ये होता.
अमेरिकेच्या भूगर्भ सर्वेक्षण विभागाने आणि भारताच्या राष्ट्रीय भूकंप केंद्राने 7.1 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद केली आहे तर चीनच्या शिन्हुआ या वृत्तसंस्थेने 6.8 रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद झाल्याचे वृत्त दिले आहे.
भूकंपामुळे जमीन हादरली. नेपाळमध्ये नागरिक घाबरून घरांबाहेर आले आणि बराच वेळ रस्त्यांवरच उभे होते. भारतात बिहार आणि उत्तर प्रदेशसह दिल्ली एनसीआरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. याआधी डिसेंबर 2023 मध्ये चीनच्या गांसु आणि किंघई प्रांतात 6.2 रिश्टर क्षमतेचा भूकंप झाला. या भूकंपामुळे 126 जणांचा मृत्यू झाला होता.