Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्यातील आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‌‍वभूमीवर मंगळवारी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (मनसे) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीतील पराभव विसरुन नव्या दमाने कामाला लागण्याचा सल्ला दिला. विधानसभेत झालं ते विसरा आणि महापालिकेच्या तयारीला लागा, असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. ही बैठक संपल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे काय बोलले आणि त्यांनी काय निर्णय घेतले, याबाबत माहिती दिली.
संदीप देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांच्याकडून लवकरच मनसे पक्षसंघटनेत बदल केले जाणार आहेत. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे बदल करण्यात येणार आहेत. विधानसभेनंतर महापालिका निवडणुकीला कसं सामोरं जायचं याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. मनसे पक्षसंघटनेचा कायापालट झाला पाहिजे, त्यादृष्टीने बदल करण्यात यावेत, याबाबत आज निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता पक्षात महत्त्वाचे बदल केले जाणार असल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
तसेच मनसेच्या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाशी युती करायची, याचीही चर्चा झाली. भाजपलाही मते देणारी मराठी माणसेच आहेत. युतीबाबतच्या चर्चा होतील मात्र अंतीम निर्णय राज ठाकरे घेतील. दोन्ही ठाकरे बंधुंनी एकत्र यावे, अशी चर्चा मीडियात आहे. विधानसभेत युती का झाली नाही? त्यावेळी काय चर्चा झाल्या? कशामुळे नुकसान झालं याचा आढावा मनसेच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करण्याबाबत मनसे पुढे काही पावले उचलणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागली आहे.
महापालिका निवडणूकीपूर्वी मनसे नेत्यांची एक टीम तयार करण्यात येईल. ही टीम राजकीय स्थितीचा आढावा घेईल. आगामी निवडणूकीत मनसेची राजकीय वाटचाल इतर पक्षांसोबत युतीबाबतच्या चर्चा याबाबतचे अंतीम निर्णय घेताना राजकीय आढावा घेणाऱ्या टीमची मते लक्षात घेतली जातील.
आज मनसेच्या विभाग अध्यक्षांच्या बैठक झाली. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश राज ठाकरेंनी बैठकीत दिला. मनसेच्या विभाग अध्यक्षांना संघटना बळकट करण्याचे आदेश देण्यात आलेत.