xr:d:DAFE2z96yaU:1176,j:1387839368,t:23032313
Spread the love

कृषी मंत्र्यांचे सूचक वक्तव्य

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणीच्या योजनेसह शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा प्रचारात होता. महायुतीची सत्ता आल्यावर कर्जमाफी करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफी कधी होईल याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला लाडकी बहीणमुळे उशीर होण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी तसे स्पष्ट संकेतच दिले आहे.
राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी रविवार माध्यमांशी बोलताना शेतकरी कर्जमाफीबाबतही भाष्य केले. कोकाटे यांनी म्हटले की, लाडकी बहीण योजनेत 1500 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातात. मात्र, या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडला असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत विचारले असता त्यांनी थेट भाष्य करणे टाळले.
माणिकराव कोकाटे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर काही प्रमाणात दबाव आहे. महायुतीकडून निवडणूक प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, लाडकी बहीण योजनेमुळे शेतकऱ्यांची कर्जमाफीला काही प्रमाणात उशीर होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. सरकारने याआधीच शेतकऱ्यांची वीज बिल माफीसाठी 15000 कोटी रुपये दिले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
त्याचा निर्णय महिलांनी घ्यावा
लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांना नमो महासन्मान योजनेचा लाभ सोडावा लागेल का, असा प्रश्न विचारली असता कोकाटे यांनी याबाबतचा निर्णय महिलांनाच घ्यायचा असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी फायदेशीर ठरली आहे. त्यांना काही प्रमाणात आर्थिक स्वातंर्त्य दिले आहे. मात्र, सरकारच्या दोन योजनांचा फायदा एकाच व्यक्तीला घेता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
30 लाख महिला अपात्र शेतकरी अपात्र होणार?
लाडकी बहीण योजनेसाठी आता सरकारकडून निकष लावण्यात येणार आहेत. लाडकी बहीण योजनेचा फायदा घेणाऱ्या महिलांची पात्रता पडताळणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. लाडकी बहीण शिवाय सरकारच्या इतर थेट निधीच्या हस्तांतरणाशी संबंधित योजनेचा फायदा घेत असल्यास त्या महिलांना एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यात जवळपास 20 लाख महिला शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान योजनेचा फायदा मिळत आहे. यासह इतर कृषी योजनांच्या फायदा घेणाऱ्या महिलांची संख्या 30 लाखाच्या घरात आहे. त्यामुळे या महिला लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरण्याची भीती आहे.