केज/महान कार्य वृत्तसेवा
बीडमधील केज येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे हे तब्बल 26 दिवसानंतर पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याचदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण ढवळून काढणाऱ्या या हत्याकांडासंदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचं गुजरात कनेक्शन आता समोर आले आहे.
गुजरात कनेक्शन आले समोर
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे घटनेनंतर गुजरातला गेले होते, अशी माहिती समोर आली आहे. गुजरातमध्ये घुले आणि सांगळे या दोघांनी 3 तारखेपर्यंत एका देवस्थानात मुक्काम केला होता. मात्र पैसे संपल्याने हे दोघेही पुण्यात आले. एका व्यक्तीला भेटून पैसे घेण्यापूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना बेड्या ठोकल्या. बीडमधील केज येथील वायबसे दाम्पत्याला पोलिसांनी चौकशीला बोलावले आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी घुले आणि सांगळेला पकडण्यात यश आले.
तीन दिवसांपूर्वीच हे तिघे वेगळे झाले
सुदर्शन, सुधीर व नव्याने समावेश झालेल्या सिध्दार्थ सोनवणे या तिन्ही आरोपींना केज न्यायालयातून बाहेर काढताच नेकनूर पोलिस ठाण्यात आणले. येथे एसआयटी प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांनी या तिन्ही आरोपींची कसून चौकशी केली. यामध्ये नंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवत चौकशी केली. अटक होण्याच्या तीन दिवसांपूर्वीच हे तिघे वेगळे झाले होते, असं तपासामध्ये समोर आले आहे.
…म्हणून अचानक पुण्यात आले
सुदर्शन घुलेजवळ असलेले पैसे दोन ते तीन दिवसांपूर्वी संपले. त्यामुळे कृष्णा आंधळे या लोकांना पैसे देण्यासाठी परत महाराष्ट्रात आला होता. एका व्यक्तीकडून पैसे घेऊन तो परत जाणार होता; परंतु त्याची वाट न बघताच घुले आणि सांगळे दोघेही पुण्याला आले. घुले आणि सांगळे एका व्यक्तीला भेटणार होते. परंतु त्याआधीच पोलिसांनी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. कृष्णा फरार होण्यात यशस्वी ठरला.
गुजरातमध्ये काय केलं?
संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर घुले, आंधळे आणि सांगळे हे तिघेही आरोपी सोबतच होते. रेल्वेने हे तिघेही गुजरातमध्ये गेले. तेथे ते शिवमंदिरात थांबले. जवळपास पंधरा दिवस तिघेही तेथेच राहिले. मंदिरातच जेवण आणि झोपणे अशी त्यांची दिनचर्या होती.
युट्यूबवर पाहिली हत्या प्रकरणाची बातमी अन्…
सुदर्शन घुलेसह तिघे जण एका रेल्वेस्थानकावर होते. एका व्यक्तीचा मोबाइल घेतला. त्यात देशमुख हत्या प्रकरणाची बातमी यू ट्यूबवर पाहिली होती. तेथूनच त्यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. त्यामुळे ते महाराष्ट्रात थांबले नाहीत.