Spread the love

पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

नाशिक/महान कार्य वृत्तसेवा
नाशिक जिल्हा रुग्णालय विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असते. मात्र जिल्हा रुग्णालय आता एक वेगळ्या प्रकरणाने पुन्हा चर्चेत आले आहे. रुग्णालयातून शनिवारी पाच दिवसांचे बाळ चोरी झाल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.
नाशिक जिल्हा रुग्णालयात सुमन खान या महिलेची प्रसूती झाली. मात्र त्यानंतर या महिलेवर सपना मराठे नामक महिलेने दोन दिवसांपासून रेकी केली आणि खान दाम्पत्याचा विश्वास संपादन केला. सपना मराठे ही महिला या खान दाम्पत्यासोबतच जिल्हा रुग्णालयात राहत होती. बाळाला सांभाळते असे सांगून शानिवारी दुपारी ती महिला नवजात बाळ घेऊन पसार झाली. बाळाच्या नातेवाईकांनी बाळाची शोधाशोध सुरू केली आणि तात्काळ जिल्हा रुग्णालयाने या संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. आता पोलीस तपासात या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांच्या बाळाची चोरी
नाशिक जिल्हा रुग्णालयात पाच दिवसांचे बाळ हरवल्याची फिर्याद अब्दुल खान यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिली. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ विविध पथके रवाना केली. नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि इतर परिसरात पोलिसांची शोधाशोध सुरू होती. पंचवटी येथील एका खासगी रुग्णालयात एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी या महिलेची माहिती घेतली असता ही तीच महिला असल्याची पोलिसांना खात्री झाली. सपना मराठे ही महिला धुळे जिल्ह्यातील असल्याचं समोर आलं आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवले. बाळ चोरी करणाऱ्या महिलेला नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी शहरात पोलिसांना मिळून आली. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता बाळ चोरी का केली हे सांगताना महिलेने सांगितलेली हकीगत बघून पोलीस देखील काही काळ चक्रावले.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्याने ही महिला नाशिक जिल्हा रुग्णालयात आली आणि नवजात बाळ चोरी करण्याचे ठरवले. सपना मराठे ही महिला उच्चशिक्षित असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या महिलेचे दोनदा गर्भपात झाले असून या महिलेला बाळ होत नसल्याने या महिलेने बाळ चोरी केल्याचं पोलिसांना सांगितले आहे. महिला आणि तिचे पती हे दोघे धुळे येथे वास्तव्यास आहेत. एमबीएचे शिक्षण झालेल्या महिलेने लेखापाल पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण केली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून महिलेने इतर नातेवाईकांना न भेटता गर्भवती असल्याचे सांगितले होते आणि बाळ चोरी करून ही महिला तिच्या घरी गेली. महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर सपना मराठे ही खोटे बोलत असल्याचे समोर आले आणि तिचा संपूर्ण बिंग फुटले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
दरम्यान, नाशिक जिल्हा रुग्णालयात हा प्रकार घडल्यानंतर पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मागील महिन्यात जिल्हा रुग्णालयातून बाळ अदलाबदल झाल्याची घटना घडली होती. आता जिल्हा रुग्णालयातून थेट बाळच चोरी गेल्याने जिल्हा रुग्णालय प्रशासनावर टीकेची झोड उठली. जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनावर आरोग्य विभागाचा वचक आहे की नाही? असे एक ना अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. पोलिसांच्या तत्परतेमुळे अवघ्या बारा तासात बाळ सापडले. मात्र, अशा कितीतरी घटना जिल्हा रुग्णालयात घडत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक रुग्णालय प्रशासनावर अंकुश ठेवण्यात किती यशस्वी ठरणार? हे येणाऱ्या काळात समोर येईल.