Spread the love

नांदेड/महान कार्य वृत्तसेवा
6 एप्रिल 2006 रोजी नांदेडच्या पाटबंधारे नगर येथे राजकोंडवार यांच्या घरी एक मोठा स्फोट झाला होता. यात नरेश राजकोंडवार आणि हिमांशू पानसे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अन्य तिघे जखमी झाले होते. हा स्फोट बॉम्बचा होता असा आरोप करत ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोग करण्यात आला होता. या प्रकरणात एकूण 13 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खटला दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरुवातील नांदेड पोलीस त्यानंतर एटीएस त्यानंतर सीबीआयने केला. यातील काही आरोपींवर जालना, परभणी आणि मालेगाव येथल्या स्फोट प्रकरणातही आरोपी करण्यात आले होते. 19 वर्षात या खटल्यात एकूण 49 साक्षीदार तपासण्यात आले होते. अखेर आज नांदेड न्यायालयाने सकाळी सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केल्याचा निकाल दिला. हा बाँबस्फोट नव्हता तर फटाक्यांचा स्फोट होता. त्यामुळे कोर्टानं सर्वच आरोपींना निर्दोष सोडल्याचं आरोपींचे वकील नितीन रुनवल यांनी सांगितलं. तब्बल 2 हजार पानांची चार्जशीट यात दाखल करण्यात आली होती.
आरोपींची निर्दोष मुक्तता : नांदेड येथे झालेल्या 2006 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्द वापरण्यात आला होता. त्यानंतर हिंदू समाजसुधारक दहशतवादी आहे असा आरोप करण्यात आला. मात्र न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या. राहुल पांडे (मयत), लक्ष्मण राजकोंडवार, संजय चौधरी, रामदास मुलगे, डॉ. उमेश देशपांडे, हिमांशू पानसे (मयत), नरेश राजकोंडवार (मयत), मारुती वाघ, योगेश विडोळकर, गुरुराज तुप्तेवार, मिलिंद एकताटे, मंगेश पांडे, राकेश धावडे, यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
काय आहे प्रकरण : 6 एप्रिल 2006 रोजी रात्री दीड वाजता पाटबंधारे वसाहतीतील एका घरात अचानक मोठा आवाज झाला. आसपासचे लोक घटनास्थळी दाखल झाले होते. भाग्यनगर पोलिसांना माहिती मिळतातच ते घटनास्थळी दाखल झाले होते. स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता. स्फोट नेमका कशानं झाला याचा शोध घेण्यात आला. पोलिसांनी पहिल्या दिवशी हा स्फोट फटाक्यांचा आहे असं पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी स्फोट हा बॉम्बस्फोट असल्याची माहिती पोलिसांच्या वतीने पुन्हा एक पत्रकार परिषद घेऊन देण्यात आली होती. तेव्हापासून देशभरात नांदेडचे नाव गाजले होते.