अजितदादा गटातील आमदाराच्या आरोपाने भुवया उंचावल्या
नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
बीड येथील मस्साजोग गावचे माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला आज पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तर सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड 22 दिवसांपासून बेपत्ता होता. तो 31 डिसेंबर रोजी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आला. या प्रकरणावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
प्रकाश सोळंके म्हणाले की, बीड प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलेली आहे. त्यामुळे आता देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल असं वाटतं. मात्र हा न्याय मिळेपर्यंत मंत्री धनंजय मुंडे यांना पदापासून दूर ठेवले पाहिजे, अशी मागणी मी केलेली आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या अशी मागणी मी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे आणि जाहीर सभेतही या वर मी बोललेलो आहे, असे त्यांनी म्हटले.
धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा
ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निष्पक्षपातीपणे चौकशी करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे, यावर माझा विश्वास आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना वाल्मिक कराड घटनाबाह्य सत्ताकेंद्र होतं. त्यांनी खंडणी आणि किती खून केले? त्याचा तपास झाला पाहिजे. धनंजय मुंडे यांना कोणी वाचवत आहे, असं मला वाटत नाही. मात्र, त्यांचा राजीनामा हा घेतलाच पाहिजे. या प्रकरणामुळे बीडमध्ये मोठं सामाजिक ध्रुवीकरण झालं आहे, ते झालं नाही पाहिजे. यात जातीवाद न आणता जे गुन्हेगार आहेत, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असेही प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.
परभणीत आज मूक मोर्चा
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी आज परभणीत सर्वपक्षीय, सर्वजातीय, सर्वधर्मीय मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता नूतन महाविद्यालय येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत हा मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी तसेच भाऊ धनंजय देशमुख, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, आमदार संदीप शिरसागर, ज्योती मेटे यांच्यासह स्थानिक परभणी जिल्हा प्रतिनिधी, खासदार, आमदार उपस्थित आहेत.