Spread the love

बीड/महान कार्य वृत्तसेवा
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडने 31 डिसेंबर रोजी सीआयडीला सरेंडर केलं होतं. त्यानंतर अनेक दिवासांपासून फरार असलेले सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला काल (03 जानेवारी) ताब्यात घेण्यात आले.
कोण आहे सुदर्शन घुले?
सुदर्शन घुले बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवाशी आहे. सुदर्शन घुले 27 वर्षांचा आहे. सुदर्शनचं इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली देखील करायचा. सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे. सुदर्शनवर 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. याचदरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला काही कामं मिळाली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो तरबेज असल्याचे गावकरी सांगतात.
पैसेही डॉक्टरनेच पुरवले होते-
हत्या प्रकरणातील फरार आरोपींना पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयातून, डॉ. संभाजी वायभसे, त्याची वकील पत्नी आणि एकाला काल एसआयटीने नांदेडमधून ताब्यात घेतलं. या तिघांची रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी कसून चौकशी केली, त्यातूनच मुख्य आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांचा ठावठिकाणा समजला असं पोलिसांनी आपल्या प्रेसनोटमध्ये म्हटलंय. मुख्य आरोपींशी डॉ. वायभसेने घटनेच्या दिवशी संपर्क केला होता, तसंच पैसेही डॉक्टरनेच पुरवले होते असं तपासात उघड झालं आहे.