Spread the love

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
जगभरातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. बदलत्या हवामानाचा मोठा ङ्गटका जगातील अनेक देशांना बसत आहे. 2024 वर्षाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हे वर्ष जसे उष्ण राहिले, तसेच 2025 हे नवीन वर्ष देखील सर्वात जास्त उष्ण ठरण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान संघटनेने याबाबतचा इशारा दिला आहे.
पुढील वर्षी देखील या वर्षीसारखेच विक्रमी तापमान दिसून येईल असा अंदाज डब्ल्युएमओने व्यक्त केला आहे. त्यामुळं हरितगृह वायूंची पातळी आणखी वाढू शकते. ज्यामुळे भविष्यात आपल्याला अधिक उष्णतेचा सामना करावा लागू शकतो. डब्ल्युएमओ च्या मते, 2024 नंतर 2025 हे सर्वात उष्ण वर्षापैकी एक असू शकते. त्याचा परिणाम जगभर दिसून येईल. युनायटेड नेशन्सचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, गेले एक दशक झाले आपण प्राणघातक उष्णतेतून जात आहोत. जे देश शांत आणि निरोगी भविष्यासाठी काम करत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही उभे असल्याचे ते म्हणाले. डब्ल्युएमओ चा संदर्भ देत गुटेरेस म्हणाले की, 2015 ते 2024 पर्यंतच्या हवामान बदलाने स्पष्ट संकेत दिले आहेत.
भविष्यातील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता
दरम्यान, या हवामान बदलाच्या स्थितीतून आपण बाहेर पडलो नाही, तर भविष्यातील परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा गुटेरेस यांनी दिला. त्यांच्या मते, 2025 मध्ये अनेक देशांना उत्सर्जन कमी करावे लागेल आणि सुरक्षित मार्गाचा अवलंब करावा लागेल. ऊर्जा संकटाचा सामना करण्यासाठी आणि हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी काम करावं लागेल. स्वच्छ आणि शाश्‍वत उर्जा स्त्रोतांकडे आपण वाटचाल करायला हवी असेही टोनियो गुटेरेस म्हणाले.
हवामान बजलाच्या संकटाचा सामना करण्याची प्रत्येकाची जबाबदारी
हवामान बदलाच्या संकटावर काम करणं ही एका देशाची जबाबदारी नसून ती जागतिक जबाबदारी आहे. हवामान संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक देशाला एकजुटीने काम करावे लागेल. आपल्या भावी पिढ्यांसाठी सुरक्षित आणि निरोगी वातावरण निर्माण करणे हे आपल्या पिढीचे कर्तव्य असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
हवामान बदलाचा शेती क्षेत्राला देखील मोठी फटका
दरम्यान, सध्या हवामान बदलाचा मोठा फटका जगभरातील अनेक देशांना बसत आहे. याचा आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान बदलाचा शेती क्षेत्राला देखील मोठी फटका बसत असल्याचे पाहायला मिळत आहे.