पुणे/महान कार्य वृत्तसेवा
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आलेला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार असल्याचा आरोप केलेला वाल्मिक कराड आज पुण्यात सीआयडीसमोर शरण आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड तीन आठवड्यांपासून फरार होता. या प्रकरणात आतापयर्ंत चार आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत. त्यामध्ये वाल्मीक कराड याचेही नाव होते. वाल्मीक कराड याचा शोध सीआयडीकडून घेतला जात होता.
तर मी शिक्षा भोगायला तयार – वाल्मिक कराड
मी वाल्मीक कराड केज पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरोधात खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण येथे सरेंडर होत आहे. संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय रोषापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे, पोलीस तपासाचे निष्कर्ष येतील. त्यात मी जर दोषी दिसलो तर मला शिक्षा द्यावी ती मी भोगायला तयार आहे असं वाल्मीक कराड यांनी स्वत: शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.