Spread the love

मुंबई/महान कार्य वृतसेवा

महायुतीच्या नव्या सरकारमध्ये नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाह्य मतदारसंघातून निवडून आलेले दादा भुसे यांना शालेय शिक्षण मंत्रि‍पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर पदभार स्वीकारण्याआधीच भुसे यांनी विविध शाळांना भेटी देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला होता. त्यानंतर ते मंत्रि‍पदाचा पदभार कधी स्वीकारणार याकडे, सर्वांचे लक्ष लागून होते. यानंतर आज मंत्री भुसे यांनी मंत्रालयात नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांच्या ५० विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला.

मंत्री दादा भुसे यांनी आज सकाळी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्यासह विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी संस्था, समाज कल्याण, आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवलेल्या ५० विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मंत्री दादा भुसे बसमधून मंत्रालयाकडे पदभार स्वीकारण्यासाठी रवाना झाले होते. त्यानंतर आज त्यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पदभारस्वीकारला.

शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करून चांगले काम करून दाखवणार

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी नाशिकवर सोपवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुमोदन दिले आहे. ज्या संवेदनेने त्यांनी शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्यावर दिली. त्यामुळे मला जाणीव आहे की हे एक मोठं आव्हानात्मक काम आहे. सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून आम्ही येणाऱ्या काळात चांगल्यात चांगले काम करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार असून विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांशी चर्चा करून प्राधान्यक्रम ठरविणार आहे. तर स्वच्छता गृह, शाळा दुरुस्ती, ई – शाळा सुरू करणे, असे अनेक उपक्रम राबवणार असल्याचे दादा भुसे यांनी सांगितले.