Spread the love

पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन मंत्री नितेश राणेंचे परखड मत
हिरवे साप वळवळतात अन्‌‍ वातावरण खराब करतात; पुण्यातील घटनेवर मंत्री नितेश राणेंची जीभ घसरली


पुणे/महान कार्य वृत्तसेवा
राज्यातील पुरोगामी विचाराचे शहर आणि शैक्षणिक पंढरी असलेल्या पुणे शहरात भगवा आणि हिरव्या रंगाचा वाद रंगल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील सदाशिव पेठेमध्ये एका भिंतीवर हिरवा रंग लावून चादर आणि फुलं चढवल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेची दखल घेत भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी भींतीचा रंगच बदलून टाकला आहे. मेधा कुलकर्णी आणि त्यांच्या समर्थकांनी भींतीवरील त्या हिरव्या रंगावरती भगवा रंग देऊन त्या ठिकाणी एक गणपतीचा फोटो ठेवला आहे. पुणे शहरातच नाही, तर महाराष्ट्रसह इतर अनेक ठिकाणी हे प्रकार सध्या वाढले असल्याचा दावाही मेधा कुलकर्णी यांनी केला. आपल्या आजूबाजूला काय घडतंय याकडे एक सजग हिंदू म्हणून आपण लक्ष देऊया कृती करूया, असं आवाहनही त्यांनी केलं. त्यानंतर, आता भाजपचे हिंदुत्ववादी नेते आणि मंत्री नितेश राणे यांनीही पुण्यातील घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील घटनेवर बोलताना मी मेधाताईंचे अभिनंदन करतो, असे म्हणत मेधा कुलकर्णी यांचे समर्थनही राणेंनी केले. हिरवे आक्रमण होत आहेत, हिरवे साप वळवळतात आणि वातावरण खराब करतात. पण, हिंदू समाज म्हणून हे काम केलं पाहिजे, असे वळवळणारे साप ठेचलेत पाहिजेत, असे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले. कडवट हिंदुत्ववादी म्हणून राज्यात असे प्रकार होणार नाही हा संदेश आधीच गेलाय. हिरवे आक्रमण थांबवणे आमचे कर्तव्य आहे, अशा शब्दात नितेश राणेंनी नेहमीप्रमाणे भूमिका मांडली. मात्र, नितेश राणे हे राज्याचे मंत्री आहेत, त्यामुळे मंत्री म्हणून त्यांची जीभ घसरल्याचे बोलले जात आहे.
अयोध्या मिळवले श्रीकृष्णभूमीही मिळवणार
जे आमचे आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे आणि त्यावर आमचा अधिकार आहे. इस्लामिक आक्रमण झालं, मंदिरावर मस्जिदी बांधण्याचा कार्यक्रम केला. मात्र, ही भूमी आमची आहे, येथील इंच न्‌‍ इंच जमीन आमची आहे. अयोध्या मिळवलं, आणि श्रीकृष्ण भूमीदेखील मिळवून राहणार असे म्हणत मंत्री नितेश राणे यांनी मुथरा येथील जागेवरुन पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्दयावरुन परखड मत व्यक्त केलं आहे. एका बाजूला कायदेशीर मार्गाने चालत आहोत आणि त्याचबरोबर हिंदू समाजात जागृती झाली पाहिजे. आपण एकत्र आहोत, आपल्याकडून जे घेतलं गेलं तिथे आपले मंदिर आहे, जे मिळवलं पाहिजे, अशा शब्दात नितेश राणेंनी आपली भूमिका मांडली आहे.