Spread the love

अंजली दमानियांचा फडणवीसांना थेट सवाल

मुंबई/महान कार्य वृत्तसेवा
बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरणामुळे राज्याचे वातावरण चांगलेच तापले आहे. शनिवारी बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून राजकीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणात जे आरोपी फरार आहेत, त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा. तसेच बंदुकीसोबत ज्यांचे-ज्यांचे फोटो आहेत, ते जर खरे असतील तर त्या सर्वांचे परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा, असे आदेश दिले. आता यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
अंजली दमानिया म्हणाल्या की, फरार आरोपींची संपत्ती जमा करा, असे आदेश त्यांनी दिले आहे. त्यात वाल्मिक कराडचे नाव आहे की नाही? याची स्पष्टता त्यांनी आपल्यापर्यंत दिलेली नाही. वाल्मिक कराडची संपत्ती जप्त होणार की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच अजित पवारांची 1000 कोटींची संपत्ती त्यांना पुन्हा वरदान म्हणून देण्यात आली, तशीच ही जप्त झालेली संपत्ती तुम्ही पुन्हा देणार असाल तर हे चालणार नाही. तुम्ही स्पष्ट लिहून आदेश द्या की, एकदा जप्त झालेली संपत्ती कोणत्याही कारणाने त्यांना परत दिली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले.
दहशत पसरवणाऱ्यांवर काय कारवाई होणार?
अंजली दमानिया पुढे म्हणाल्या की, ज्या लोकांकडे शस्त्र परवाने आहेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे, असे फडणवीस यांनी आदेश दिले. त्याचे मी स्वागत करते. पण असे अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडे शस्त्र आहेत. पण, परवाने नाहीत त्यांच्यावर काय कारवाई करणार? जे दहशत पसरवतात त्यांच्यावर काय कारवाई करणार? याबाबत देवेंद्र फडणवीस काही म्हणाले नाहीत. याबाबत त्यांनी खुलासे करावेत, असे त्यांनी सांगितले.
अंजली दमानियांना बीड पोलिसांची नोटीस
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा अंजली दमानिया यांनी केलाय. यानंतर अंजली दमानिया यांना बीड पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. अंजली दमानिया यांनी फरार आरोपीच्या संदर्भात जो मृत्यूचा दावा केलाय, त्याचे स्पष्टीकरण देण्याच्या सूचना नोटीसद्वारे करण्यात आल्या आहेत. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे द्यावे, असे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.