Spread the love

शिमला/महान कार्य वृत्तसेवा
हिमाचल प्रदेशातील शिमला आणि मनालीमधल्या हवामानामुळे ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक या ठिकाणी दाखल झालेल्या पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, त्याचवेळी गेल्या 24 तासांमध्ये हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टीमुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे. हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. कुल्लूमधील धुंडी आणि मनाली-लेह महामार्गावरील अटल बोगद्याच्या उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दरवाजांवर सुमारे 1,500 वाहने बर्फात अडकल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही वाहने हटवण्यासाठी मोठी बचाव मोहीम राबवण्यात आली आहे. अटल बोगदा आता प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे लांब वाहतूक कोंडी निर्माण झाली आणि अनेक पर्यटक रात्रभर वाहनांमध्ये अडकून पडले आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये वाहन घसरल्याने झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. मनालीचे डीएसपी केडी शर्मा यांनी सांगितले कि, ’सोमवारी दुपारी 2 वाजता सुरू झालेले बचावकार्य रात्रभर सुरू राहिले, ज्यामध्ये लोकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी पोलिस कर्मचार्‍यांनी शून्य तापमानात अथक परिश्रम घेतले. दुसर्‍या दिवशी सकाळी 10 वाजेपयर्ंत सर्व वाहने बाहेर काढण्यात आली आणि अडकलेल्या सर्व 8 हजार पर्यटकांची सुटका करण्यात आली.’ मुसळधार बर्फवृष्टीमुळे मनाली-लेह महामार्गावरील वाहनांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला, त्यामुळे प्रवाशांना विलंब आणि समस्यांना सामोरे जावे लागले.
हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमुळे तीन राष्ट्रीय महामार्गासह किमान 223 रस्ते बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकार्‍यांनी मंगळवारी दिली आहे. बर्फाचा थर साचल्यामुळे 700 पेक्षा जास्त वीजेचे रोहित्र बंद करण्यात आले आहेत. अटारी आणि लेह दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग, कुल्लू जिल्ह्यातील सेंज ते औट, किन्नौर जिल्ह्यातील खाब संगम आणि लाहौल-स्पीती जिल्ह्यातील ग्रम्फू यासह सुमारे 223 रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
हिमाचल प्रदेशातील सात जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस सतत बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 26 डिसेंबरच्या रात्री वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा सक्रिय होईल, त्यामुळे 27 आणि 28 डिसेंबर रोजी पर्वतांमध्ये पाऊस आणि हिमवर्षाव होण्याची शक्यता आहे.