पुणे/महान कार्य वृत्तसेवा
राज्यात महायुतीने प्रचंड बहुमतासह सत्तेत पुनरागमन केले. सत्ता वाटपाचा तिढा अनेक दिवस सुरू असल्याने महायुतीत सगळंकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली होती. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर मंत्र्यांनी पदभारही स्वीकारला. तर, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या खासदाराने थेट गृह खात्यावर लेटर बॉम्ब डागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या खात्यावर आरोप झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट राज्याच्या गृह विभागावर निशाणा साधला आहे. पिंपरी चिंचवड पोलीस हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोप खासदार बारणे यांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
पत्रात काय म्हटले?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या गृह खातं आहे, असं असून देखील पिंपरी चिंचवड पोलीस नागरिकांना दाद देत नाहीत, तक्रारी दाखल करून घेत नाहीत आणि हफ्ते वसुली करून वरिष्ठांना देतात असं लेखी पत्र देत खासदार बारणे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्याच्या गृहविभागाच्या कारभारावर बोट ठेवल आहे.
बारणे हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांनी केलेल्या या आरोपामुळे भाजप आणि शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे. या सगळ्या प्रकारचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किती गांभीर्याने लक्ष देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हप्ता वसुलीचा आरोप करण्यात आला होता. देशमुख यांच्यावर आरोपांची राळ उडवण्यात आली होती. पोलिसांना 100 कोटी वसुलीचे टार्गेट देण्यात आल्याचा आरोप देशमुखांवर करण्यात आला होता. त्यानंतर भ्रष्टाचार आणि अन्य आरोपात देशमुख यांना तुरुंगात जावे लागले होते. सध्या अनिल देशमुख जामिनावर मुक्त आहेत.
