इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी शहरासाठी मंजूर केलेली सुळकूड पाणी योजनेची तातडीने अंमलबजावणी होण्यासाठी आमदार डॉ. राहूल आवाडे यांनी विधासभागृहाचे लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी औचित्याचा मुद्या उपस्थित करीत केली.
राज्य शासनाने अमृत 2.0 अंतर्गत 160.84 कोटीची दूधगंगा नदी वरुन योजना मंजूर केलेली आहे. परंतु नदीकाठावरील ग्रामस्थांच्या विरोधामुळे या योजनेचे काम प्रलंबित राहिले आहे. या योजनेच्या कामाची निविदा प्रक्रियासुध्दा झाली असून केवळ विरोधामुळे कामाची अंमलबजावणी होत नाही. वस्त्रनगरी इचलकरंजीला मुबलक व स्वच्छ पाण्याची गरज असल्याने सुळकूड योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. याच सुळकूड योजना संदर्भात आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आवाज उठविला.
इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र असून औद्योगिक पसारा वाढत चालला आहे. तसेच उदरनिर्वाहाच्या निमित्ताने राज्याच्या कानकोपर्यातून अनेक कुटुंबे याठिकाणी वास्तव्यास आहेत. त्यामुळे कष्टकरी कामगारांची संख्या लक्षणीय आहे. औद्योगिकरण आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता या शहराला पिण्याच्या पाण्याची गरज आहे. सुळकूड योजना मंजूर आहे. परंतु योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यास विलंब होत आहे. त्यामुळे वस्त्रनगरीची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी तातडीने सुळकूड योजना संदर्भात बैठक घेऊन ही योजना मार्गी लावावी, अशी मागणी आ. आवडे यांनी केली.