नवी दिल्ली/महान कार्य वृत्तसेवा
सध्या संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु आहे. हिवाळी अधिवेशनात खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर सत्ताधारी पक्षाकडून दिली जात आहेत. याशिवाय विविध विधेयके देखील सादर करण्यात येत आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेत माहिती दिली की विजय माल्ल्याची संपत्ती विकून विविध बँकांना 14 हजार कोटी रुपये परत करण्यात आले आहेत. याशिवाय निरव मोदी याची संपत्ती विकून 1053 कोटी रुपये देखील बँकांना देण्यात आले. या दोन्हीसह विविध घोटाळ्यात अडकलेल्या रकमेसह एकूण 22280 कोटी रुपये संबंधितांना परत करण्यात आली आहे. ईडी आणि बँकांनी मुंबईच्या विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीच्या संपत्तीच्या विक्रीच्या परवानगीच्या मागणीसाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. नीरव मोदीनं पंजाब नॅशनल बँकेच्या 13 हजार कोटी रुपयांचं मनी लाँड्रिंग केलं होतं. त्यानंतर तो देश सोडून पळून गेला होता. विशेष कोर्टानं ईडीला मेहुल चोक्सीच्या जप्त करण्यात आलेल्या 2256 कोटींच्या मालमत्तेचं मुल्यांकन आणि आणि लिलाव करण्यास परवानगी दिली होती. विक्रीनंतर मिळणारी रक्कम मुदत ठेवीच्या रुपात पीएनबी इतर ज्यांनी कर्ज दिलेलं असेल त्यांच्या खात्यात ठेवण्याचे आदेश दिले होते.
निर्मला सीतारमण या प्रकरणी बोलताना म्हटलं की, पीएमएलएच्या प्रकरणामध्ये ईडीनं प्रमुख प्रकरणांमध्ये 22280 कोटी रुपयांची संपत्ती परत मिळवली आहे. आम्ही कुणालाच सोडलं नाही, जरी ते देश सोडून पळून गेले असले तरी आम्ही त्यांना सोडलेलं नाही. ईडीनं त्यांच्या संपत्तीचा लिलाव करुन बँकांना पैसे परत दिले आहे. आर्थिक गुन्हे करणार्यांना कोणत्याही व्यक्तीला सोडणार नसल्याचं म्हटलं.
विजय माल्ल्याच्या यूनाएटेड स्पिरिट या कंपनीची विक्री झाली आहे. तर,किंगफिशर एअलाईन देखील बंद झाली आहे. विजय माल्या भारतातून 9 हजार कोटी रुपये घेत देश सोडून गेले होते. विजय माल्याकडून 2003 मध्ये किंगफिशर एअरलाइन्स सुरु केली होती. किंगफिशरला सर्वात मोठा ब्रॅण्ड बनवण्याचा त्याचा प्रयत्न होता.यासाठी एअर डेक्कन कंपनी 1200 कोटी रुपयांना विकत घेण्यात आली होती. या निर्णयामुळं विजय माल्ल्या कर्जात बुडाले.एअर डेक्कन पाठोपाठ किंगफिशर एअरलाइन्स देखील बंद झाली. कर्जाची परतफेड करण्याची क्षमता न उरल्यानं विजय माल्ल्यानं देश सोडला.