मॉस्को :
रशिया-युक्रेन युद्ध आणखी तीव्र होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला रशियाविरूद्ध लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र वापरण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन सैन्याला युक्रेनविरोधात आण्विक शस्त्रे वापरण्याची परवानगी दिली आहे.
या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे, त्यात असे ठरवले गेले आहे की, जर कोणत्याही देशाने अणुशक्तीच्या सहाय्याने रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला तर रशिया आण्विक शस्त्रांचा वापर करेल. अमेरिकेने युक्रेनला आर्मी टॅक्टिकल मिसाइल सिस्टम वापरण्यास परवानगी दिली असून, ही प्रणाली 300 किमीपयर्ंत अचूक हल्ला करू शकते. अमेरिकेने ऑक्टोबर 2023 मध्ये युक्रेनला एटीएसीएमएस क्षेपणास्त्र दिली होती. परंतु त्यावर मर्यादा होती. आता या अटी काढून टाकल्याने युक्रेन अधिक आक्रमक होऊ शकते. ङ्ग्रान्सने देखील युक्रेनला स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्र दिली होती. परंतु ती सुध्दा मर्यादित वापरासाठी होती. या बदलामुळे रशियाने आपले आण्विक धोरण कडक केले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर चिंता निर्माण झाली आहे.
पुतिन यांनी म्हटले की युक्रेन या क्षेपणास्त्रांचा उपयोग अमेरिकेच्या तांत्रिक सहाय्याशिवाय करू शकत नाही. नाटोचे प्रशिक्षित जवानच ही शस्त्रे प्रभावीपणे वापरू शकतात. त्यामुळे नाटो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे युद्धात सामील होत असल्याचा इशारा पुतिन यांनी दिला आहे. या सर्व घटनांमुळे युद्ध आणखी तीव्र होण्याची आणि जागतिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.