कोल्हापूर/ विठ्ठल बिरंजे
वंचित आघाडीला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्याच्या हालचाली मंगळवारी वेगाने सुरु झाल्या. त्यांच्या मागणीप्रमाणे जागा सोडण्याची तयारी खा. संजय राउत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दर्शवली आहे. या घडमोडी पहाता हातकणंगलेची जागा वंचितसाठी सोडली जावू शकते. बुधवारी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पत्रकार परिषदेनंतर चित्र स्पष्ट होईल.
दरम्यान वंचितने महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि हातकणंगले मतदारसंघ वाट्याला आला तरी आजघडीला वंचित आघाडीकडे मतदारसंघात प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे ठाकरे सेनेकडून माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांना वंचितकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे. तर दुसर्या बाजुला अपक्ष लढण्याची तयारी करीत असलेले एकेकाळचे राजू शेट्टी यांचे शिलेदार जयशिवराय किसान संघटनेचे संस्थापक शिवाजीराव माने यांच्याही नावाचा ऐनवेळी वंचितकडून विचार होवू शकतो.
सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. याचा फायदा उठवण्यासाठी वंचितकडून शिवाजीराव माने यांना उमेदवारी दिल्यास मतदारसंघातील किमान चार लाख मराठा मते वंचितच्या बाजुने वळू शकतात असा अंदाज बांधला जात आहे.