Spread the love


मुंबई,18 मार्च (पीएसआय)
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून 20 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील शिंदे गट आणि अजित पवार गटातील पहिल्या यादीवर लक्ष लागून राहिले होते. आता शिवसेना शिंदे गटाची पहिली लोकसभा उमेदवारांची यादी आज जाहीर होणार आहे. महायुतीमध्ये काही जागांची अदलाबदल अपेक्षित आहे.
शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक
आज (18 मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटातील वरिष्ठ नेत्यांची वर्षा बंगल्यावर बैठक होत आहे. या बैठकीनंतर पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. पहिल्या यादीमध्ये 10 उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. दरम्यान, काही जागांवर वाद निर्माण झाल्याने त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार? याकडे सुद्धा लक्ष आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, हातकणंगले, ठाणे, कल्याण, तसेच मुंबईमधील जागांचा समावेश आहे.
या जागांसाठी भाजपने दावा केल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे सुद्धा या जागांसाठी आग्रही आहेत. त्यामुळे या जागांवर उमेदवार जाहीर होणार की प्रलंबित ठेवले जाणार? याकडे सुद्धा लक्ष असेल. दुसरीकडे, शिरूरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून त्याठिकाणी एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.
कोणत्या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवार जाहीर करणार?
दरम्यान, महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. काही जागांची अदलाबदली होणार असण्याची शक्यता असल्याने आता नेमक्या कोणत्या जागांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमेदवार जाहीर करणार? याची उत्सुकता आहे. शिंदे यांनी शिवसेनेला सुरूंग लावल्यानंतर 13 खासदारांनी पाठिंबा दिला होता. त्या सर्व 13 खासदारांसाठी पुन्हा उमेदवारी मिळवून देण्यासाठी ते आग्रही आहेत. मात्र, पाच ते सहा जणांची उमेदवारी बदलावी यासाठी भाजपकडून सातत्याने दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.
इतकंच नव्हे, तर त्या संदर्भात करण्यात आलेले सर्वे सुद्धा शिंदे गटाला दाखवण्यात येत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे आपल्या खासदारांना परत एकदा तिकीट मिळवून देण्यासाठी आग्रही असल्याने जागा वाटपाचा तिढा अडला आहे. दुसरीकडे अजित पवार गटाकडूनही काही जागांवर दावा करण्यात आल्याने खल सुरूच आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे पाठिंबा दिलेल्या 13 खासदारांपैकी कोणत्या 10 जागांवर उमेदवार घोषित करतात, याची उत्सुकता आहे. भाजपने यापूर्वीच मुंबईमधील सहापैकी पाच जागांवर दावा केला आहे. त्यामुळे मुंबईमधून फक्त राहुल शेवाळे यांना उमेदवारी जाहीर होते का? याकडे सुद्धा लक्ष असेल.