Spread the love


मुंबई,24 ऑगस्ट
चंद्रावर पोहोचण्याच्या भारताच्या यशाचा देशभरात आनंदोत्सव साजरा केला जात आहे. दरम्यान, सोशल मीडियावर बीबीसीचा चांद्रयान कव्हर करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा व्हिडीओ 2019 चा असल्याचे सांगितले जात आहे, जेव्हा भारताने चांद्रयान 2 मोहीम सुरू केली होती. या व्हिडीओमध्ये बीबीसी अँकर रिपोर्टरला विचारतो की, ज्या देशात करोडो लोकांना टॉयलेटही उपलब्ध नाही, अशा देशाने अंतराळ कार्यक्रमावर शेकडो कोटी रुपये खर्च करावेत? असे तो अँकर म्हणालाय, यावरून बीबीसीवर टीका होत आहे. चांद्रयान 3 मोहिमेच्या यशानंतर हा व्हिडीओ पुन्हा व्हायरल होत आहे.
खरे तर हा व्हिडीओ चांद्रयान मिशन 2 च्या काळातील असला तरी लोक बीबीसीच्या त्या प्रश्नांवर आता टीका करीत आहेत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीसुद्धा आता एका लांबलचक टिवटमधून बीबीसीच्या प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले असून, भारताच्या गरिबीसाठी ब्रिटनला जबाबदार धरले आहे. याबरोबरच हे मिशन आमच्या सन्मानाचे आहे. आता भारत अशा गरिबीतून बाहेर पडत आहे. ते म्हणाले की, ब्रिटनने आमच्या इथल्या आकांक्षा काढून घेतल्या आणि आम्हाला गरीब देशात बदलून सोडले.
आनंद महिंद्रा यांनी लिहिले, ‘सत्य हे आहे की अनेक दशकांच्या वसाहतवादी राजवटीने भारतातील गरिबी वाढवण्यास हातभार लावला, ज्याने संपूर्ण भारतीय उपखंडातील बरीच संपत्ती लुटली. आमच्याकडून लुटण्यात आलेली सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे कोहिनूर हिरा नव्,हे तर आमचा स्वाभिमान आणि आमच्या क्षमतेवर असलेला विश्वास आहे. याचे कारण असे की, वसाहतवादी सत्तेचे उद्दिष्ट म्हणजे सत्ता गाजवलेल्या लोकांना कनिष्ठ असल्याचे दाखवले. म्हणूनच आपण शौचालय आणि अवकाश संशोधन या दोन्हींवर खर्च करणे महत्त्वाचे आहे. यात कोणताही विरोधाभास नाही.
महिंद्राने टिवटमध्ये पुढे लिहिले की, ‘चंद्रावर प्रवास करून आमचा सन्मान आणि स्वाभिमान परत आला आहे. यामुळे विज्ञानाच्या माध्यमातून प्रगतीचा आत्मविश्वास मिळाला आहे. हे आपल्याला गरिबीच्या वर येण्याची आकांक्षा देते. आकांक्षांची गरिबी ही सर्वात मोठी गरिबी आहे, असेही त्यांनी अधोरेखित केलेय.