मुंबई,23 ऑगस्ट
भारताची ’शान’ चांद्रयान-3 चंद्रावर लँड झाले आणि इतिहास रचला गेला आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. चार वर्षांच्या अथक परिश्रमानंतर इस्रोला हे यश मिळाले आहे. भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम फत्ते झाली आहे. भारताचे चांद्रयान-3 चंद्रावर यशस्वीरित्या पोहोचले आहे. चंद्रावर पोहोचताच चांद्रयान-3 नं इस्रोसाठी खास मेसेज पाठवला आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा हा क्षण आणि अशी ही कौतुकास्पद इस्रोची कामगिरी आहे.
’’मी माझ्या मुक्कामापर्यंत पोहोचलो आणि तुम्ही पण’’
चांद्रयान-3 नं चंद्रावर पोहोचताच इस्रोला खास मेसेज पाठवला आहे. इस्रोने टवीट करत याबाबत माहिती दिली आहे. इस्रोने टवीट करत म्हटले आहे की, ’’चांद्रयान-3 मिशन : भारतीय, मी माझ्या मुक्कामापर्यंत (चंद्रावर) पोहोचलो आणि तुम्ही पण – चांद्रयान-3’’. भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या कुशीत पोहोचले आहे. भारताने जणू चंद्रच कवेत घेतला, अशी भावना आज प्रत्येक भारतीयांच्या मनात आहे.
40 दिवसांच्या प्रवासानंतर चंद्रावर लँडिंग
चांद्रयान-3 चंद्रावर पोहोचण्यासाठी 40 दिवस लागले. 14 जुलै रोजी पृथ्वीवरून निघालेले चांद्रयान-3 आज 40 दिवसांनंतर 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर पोहोचले. भारताची ही ऐतिहासिक चंद्रमोहिम आहे. महत्त्वाचे म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश ठरला आहे. भारताच्या इतिहासात आणखी एक सोनेरी पाने जोडले गेले आहे.
देशभरात उत्साहाचे वातावरण
भारत आता चंद्रावर पोहोचल्याने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. प्रत्येक भारतीय इस्रोच्या शास्रज्ञांचं कौतुक करत आहे. 2019 रोजी इस्रोची चांद्रयान-3 मोहिम अयशस्वी झाली. त्यानंतर चार वर्षानंतर चंद्रमोहिमेत भारताला यश मिळालं आहे. चांद्रयान-2 च्या अपयशानंतर त्यामध्ये इस्रोकडून अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आणि त्याचंच हे फळ ज्यामुळे भारत चंद्रावर पोहोचला आहे.
चांद्रयान-3 मोहिमेचे टप्पे
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर विक्रम लँडरमधील प्रज्ञान रोव्हर वेगळं होईल. प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून तेथील माहिती आणि काही नमुने गोळा करेल. ही माहिती चांद्रयान-3 इस्रोला पाठवेल. चंद्राच्या पृष्ठभागाचे काढलेले विविध फोटो इस्रोला पाठवणे, हे काम आता चांद्रयान-3 ला करणार आहे.