Spread the love

बंगळुरु,23 ऑगस्ट (पीएसआय)
भारताचे चांद्रयान 3 लँडरने चंद्राला अलिंगन दिले… इस्त्रोचे यान चंद्राच्या कुशीत गेले आणि बंगळुरुमधील इस्त्रोच्या मुख्यालयात एकच जल्लोष सुरू झाला. भारताचे चांद्रयान 3 लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले आणि अवघ्या देशाचे लक्ष इस्त्रोच्या ज्या कमांड सेंटरकडे लागले होते त्या ठिकाणी एकच जल्लोष झाला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर तरणारा भारत हा जगातील पहिलाच देश ठरला आणि याच ऐतिहासिक कामगिरीमागे ज्यांचे हात होते त्यांनी एकच जल्लोष केला. इस्त्रोतील वातावरण एकदम बदलले… सर्वजण आनंदाने खुश झाले, एकमेकांना मिठ्या मारू लागले.
भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लॅण्डिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली… श्वास रोखले गेले… हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले… आणि बातमी आली… चांद्रयान- 3 मोहीम फत्ते झाली… प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले… आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले… भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथे जगातले कुणीच गेलेले नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातलीय. त्यामुळे हा क्षण फक्त भारताच्याच नाही तर, अखंड जगाच्या इतिहासात नोंदवला जाणार आहे.
ज्या क्षणाची प्रत्येक भारतीय वाट पाहत होता तो क्षण आला… भारताचे चांद्रयान 3 मिशन 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 वाजता चंद्रावर लँड झाले आणि एकच जल्लोष झाला. गेल्या तीन चार वर्षांपासून शास्त्रज्ञांनी एकाच ध्यासाने काम केलं… त्या कामाचं आज चीज झाल्याचे चित्र इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या चेहèयावर दिसलं. इस्त्रोच्या कमांड सेंटरमध्ये एक वेगळंच वातावरण होते. मिशन ऑपरेशन कॉम्पलेक्समध्ये सर्व शास्त्रज्ञ बसले होते. चंद्रावरून येणारे प्रत्येक अपडेट त्यांना या ठिकाणी दिसत होते. चांद्रयानचे लँडर चंद्रावर उतरलं आणि इस्त्रोच्या गौरवशील इतिहासात आणखी एक पाऊस पडलं.
अनेक अडचणींवर मात अन् मोहीम यशस्वी
चंद्रावर जाण्याचं स्वप्न बèयाच देशानी पाहिलं, चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण चंद्रावर पोहोचण्याच्या प्रवासात अनेकदा वाटेतच विघ्न आली. भारताच्या चांद्रयान मोहिमेतही अडचण आली. 2019 साली चांद्रयान 2 चंद्राच्या पृष्ठभागापासून काहीच अंतरावर असताना क्रॅश झालं. पण इस्त्रो खचलं नाही. पुन्हा एकदा नव्या उमेदीने चांद्रयान 3 वर काम सुरू झालं. गेल्या मिशनमधील ज्या काही उणिवा होत्या त्या कमी करण्यात आल्या.
भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची अशी ही गोष्ट. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली, ऊर आनंदाने भरून आला. आज प्रत्येकजण इस्रोच्या शास्त्रज्ञांना कडक सॅल्युट करत एवढचं म्हणतोय, गर्व आहे मला, मी भारतीय असल्याचा. कारण, भारताच्या चांद्रयानाने चंद्राला अलिंगन दिलंय. इस्रोचं यान चंद्राच्या कुशीत शिरलंय आणि महत्त्वाचं म्हणजे, आधीच्या चंद्रमोहिमांच्या अपयशाची जळमटं क्षणार्धात कुठल्या कुठं झटकून टाकली गेलीत. भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे.