नांदेड,21 ऑगस्ट
श्रावण महिन्यात शेतीची कामे आटोपल्यावर पहिलाच सण हा नागपंचमीचा साजरा केला जातो. या सणाला शेतकèयांचा मित्र, अशी ओळख असणाèया नागाची पूजा केली जाते. कंधार तालुक्यातील डोंगरावर असलेली झाडे कोणीही तोडत नाही. दरवर्षी पंचमीच्या निमित्ताने येथे यात्रा भरते. या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास योजनेतून विकास कामे केली जात असून, हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष प्रवीण पाटील-चिखलीकर यांनी सांगितले.
अशी आहे आख्यायिका : कंधार तालुक्यातील गुंडा नागबर्डी येथे नागपंचमीच्या दिवशी नागराज यात्रा निसर्गाचे संवर्धन आणि संगोपनाची परंपरा चालवत आहे. पिढ्यानपिढ्यापासून ही परंपरा प्रसिद्ध आहे. या यात्रेला हजारो भाविक येऊन नागोबाचे दर्शन घेतात. नवसाला पावणारा नागोबा अशी याची आख्यायिका आहे. बंगाल देशातून बहीण-भाऊ उदरनिर्वाह करण्यासाठी दिंडा, गुंडा, बीडा परिसरात फिरत ते नागबर्डी माळरानावर येऊन एका मालकाची जनावरे चारत होते. येथे नागोबाच्या वारुळाला भावाने चार ते पाच खडे मारताच नागराज जागृत होऊन त्या भावाला दंश केला. मात्र त्या ठिकाणी असलेल्या लिंबाच्या पानाचा रस भावाला पाजल्यानंतर तो भानावर आला, अशी कथा सांगितली जाते.
एकही लिंबाचे झाड तोडले जात नाही : नागराजाची मूर्ती ही तेव्हापासून आहे. या नागराजाच्या माळरानाचे महत्त्व परिसरातील गावकèयांना पटल्यामुळे तेव्हापासून येथील एकही लिंबाचे झाड तोडले जात नाही. झाडे तिथेच कुजली तरी शेतकरी झाड तोडत नाहीत. दरवर्षी नागपंचमीला त्या माळरानावर नागराजाला दूध पाजले जाते. नागराज केवळ नागपंचमीच्या दिवशीच त्या वारुळात येत असतो, असे भाविक सांगतात.
नागराजाचे भाविकांना महत्व : शेकडो वर्षांपासून या नागराजाच्या मंदिराला व परिसराला वेगळे महत्त्व आहे. हे जागृत देवस्थान आहे. अनेक पिढ्यांना आध्यात्मिक कार्यासोबतच येथील निसर्गाचे संवर्धन आणि संगोपनाची चालत असलेली परंपरांची आजही जपली जाते. नागराजाचे भाविकांना महत्त्व चांगलेच ठाऊक आहे. असे सदानंद गिरी महाराज यांनी सांगितले.
देवस्थानला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा : हे देवस्थान म्हणजे एक रम्य ठिकाण आहे. याला पर्यटनस्थळाचा दर्जा द्यावा. लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी सरपंच आनंदराव शिंदे यांनी केली.
या ठिकाणी चारशे फूट उंच असलेल्या माळावर नागोबाचे वारूळ आहे. येथील झाडाची तसेच पानाची नासधूस कुणीच करत नाही.