Spread the love

मुंबई,2 जुलै

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांच्यासह 9 जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनातील दरबार हॉलमध्ये पद व गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये ज्येष्ठ नेते आणि शरद पवारांचे विश्वासून छगन भुजबळ यांचाही समावेश आहे. शपथविधी सोहळ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत छगन भुजबळ यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचे कारण सांगितले आहे.

काय म्हणाले छगन भुजबळ?

शरद पवारांनी आम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, 2024 ला पंतप्रधान मोदी हेच देशाचे नेतृत्व करणार आहे, तेच पंतप्रधान म्हणून येणार आहे. आता जर असं आहे तर त्यामुळे एक सकारात्मक विचार घेऊन त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला पाहिजे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला मदत केली पाहिजे. उगाच रस्त्यावर भांडण करून काही फायदा नाही, असे विधान मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिले आहे.

ईडी कारवाईमुळे सरकारमध्ये सामील, भुजबळ म्हणाले…

ईडी कारवाईमुळे सरकारमध्ये सामील झाल्याच्या आरोपावर भुजबळ म्हणाले, आमच्यावर केसेस आहे म्हणून आम्ही गेलो, असं नाही. अजित पवारांवरील खटले निकाली निघाले आहेत. माझ्यावर ज्या केसेस आहेत, त्यातील महत्त्वाची केस सोडली आहे. पण, अनिल यांच्यावर, अदिती तटकरे यांच्यावर तर केस नाही. संजय बनसोडेही क्लिन आहेत. हसन मुश्रीफ यांच्यावर केस आहे. पण, त्यांच्यावर आरोप झाले आहेत. कारवाई केली नाही. त्यांच्याविरोधात पुरावे नाही, कोर्टानेही कारवाई पुढे केली आहे. आम्ही आता सरकारमध्ये राहुन जनतेचे काम करणार आहोत, असंही भुजबळ यांनी सांगितले.

शरद पवार यांचा बंडाला पाठींबा नाहीच?

अजित पवार यांच्यासह काही आमदारांनी बंड केल्याने शरद पवारांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बंडाला शरद पवार यांचा पाठींबा नसल्याची सुत्रांची माहिती आहे. अजित पवारांच्या पत्रकार परिषद ऐकूणच शरद पवार प्रेसला सामोरं जाणारं असल्याची माहिती आहे. ईडीच्या भीती दाखवूनच भाजपने राष्ट्रवादी फोडला, अशी भूमिका शरद मांडू शकतात. दरम्यान, अजित पवारांच्या शपथविधी होण्याआधी पवार यांनी आपली भूमिका मांडली होती.