Spread the love

मुंबई,2 जून

राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांच्यासह 9 आमदारही शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांच्यासोबत पक्षाचे 18 आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे.

शुक्रवारी विरोधीपक्षनेतेपदाचा राजीनामा दिला, असा अजित पवार यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी पक्ष म्हणून सरकारमध्ये सहभागी झाल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. शिवसेनेसोबत गेलो तर भाजपसोबत देखील जाऊ शकतो, असे अजित पवार म्हणाले आहेत.

इथून पुढच्या काळात तरुणांना संधी देणे गरजेचे आहे. अडीच वर्षे सरकारमध्ये काम करत असतांना छगन भुजबळ हेसुध्दा सोबत काम करत होते. आता ते सोबत आलेले आहेत. काही जण टीका करत आहेत. परंतु महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत, असे अजित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करत आहेत. आपणही त्यास पाठिंबा दिला पाहिजे, असे मत आमचे सर्वच सहकाऱ्यांनी व्यक्त केले, असे अजित पवार यांनी सांगितले.

कोणत्या नेत्यांनी घेतली शपथ

अजित पवार (उपमुख्यमंत्री) , छगन भुजबळ , दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रिफ, धनंजय मुंडे , धर्मा आत्रम, आदिती सुनील तटकरे , संजय बाबुराव बनसोडे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकारी, पदाधिकारी, तालुकाध्यक्ष, युवक आणि महिला हे शरद पवार यांच्याबरोबर आहेत. आज जो शपथविधीचा कार्यक्रम पार पडला, तो ऑपरेशन लोटसचा भाग होता. त्या शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रवक्ता महेश तपासे यांनी दिली आहे.