नागपूर,5 जून
शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ही महिती दिली. ’महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. तो कधी होणार याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे घेतील,’ असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
दिल्लीत अमित शाहंशी चर्चा : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप आगामी सर्व निवडणुका एकत्र लढतील, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात दिल्लीत नुकतीच एक बैठक झाली होती. या बैठकीत यावर चर्चा झाली, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकारमध्ये 18 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला होता. नियमानुसार राज्यातील मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 43 सदस्य असू शकतात.
’आगामी निवडणुका एकत्र लढणार’ : एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळाच्या विस्तारासाठी ठराविक मुदत दिली नव्हती. तत्पूर्वी, शिंदे यांनी एका टिवटमध्ये माहिती दिली की, रविवारी रात्री ते आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली.
’दिल्लीला गेलो तर काय बिघडले?’ : काँग्रेस नेते नाना पटोले आणि शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या दिल्ली दौèयावर टीका केली होती. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ’पटोले यांच्या पक्षात एखाद्याला प्रार्थना सभेला जाण्यासाठीही हायकमांडची परवानगी लागते. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. मी दिल्लीला गेलो तर त्यात काय बिघडले?’ औरंगाबाद शहरातील मिरवणुकीत औरंगजेबाच्या फोटोच्या कथित प्रदर्शनाबद्दल विचारले असता राज्याचे गृहमंत्री फडणवीस म्हणाले की, ’असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही’.