Spread the love

जयसिंगपूर

 वैयक्तिक वादातून जीवे मारण्याच्या उद्देशाने तरुणाचे अपहरण केल्याप्रकरणातील चौघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. अनिल उर्फ आण्णासो राघू कºयाप्पा (वय ३८, रा.लठ्ठे मळा नांदणी), चेतन बाबासाहेब बसर्गे (वय ३०), सुनिल शिवाजी खिलारे (वय २६, दोघे रा. नेज, ता.चिक्कोडी) व संतोष तात्यासाब एकोंडे (वय २७, रा.सदलगा, ता.चिक्कोडी) अशी संशयीतांची नावे आहेत. याबाबतची तक्रार अभिनंदन उपाध्ये यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली होती. 

याबाबत माहिती अशी, तक्रारदार यांचा भाऊ तिर्थराज भरतकुमार उपाध्ये व संशयीत आण्णासो कºयाप्पा यांच्यात वैयक्तिक वाद होता. या वादातूनच कºयाप्पा याने मावसभाऊ चेतन बसर्गे व त्याचे इतर मित्रांना सोबत घेवून जयपाल मगदूम याची चारचाकी गाडी घेतली. या गाडीतूनच संशयीतांनी जयसिंगपूर रेल्वेस्टेशनवरुन तिर्थराजचे अपहरण केले. त्याला नेज (ता. चिक्कोडी) गावचे हद्दीतील फिल्टर जवळ आणून गंभीर मारहाण करुन जखमी केले. तो मृत झाला आहे असे समजून त्याला ऊसाच्या शेतात टाकून दिले. दरम्यान, अपहरणच्या तक्रारीवरुन गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तपासयंत्रणा गतीमान केली होती. गुन्ह्यातील संशयीत हे बेडक्याळ (ता. चिक्कोडी) येथील साखर कारखान्याच्या गाडीअड्डयात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून संशयीतांना अटक केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, उपनिरीक्षक शेष मोरे, संभाजी भोसले, रणजित पाटील, रणजित कांबळे, प्रशांत कांबळे, फिरोज बेग, सुरज चव्हाण, अमर शिरढोणे यांच्या पथकाने केली.