मुंबई,20 मे
पूर्वी नोटा बंद झाल्या त्यावेळी लोकांनी खूप काही सहन केले. या नोटबंदीमधून काळा पैसा बाहेर येईल आणि डुप्लिकेट नोटांना आळा बसेल, असे सर्वसामान्यांना वाटले होते. त्यामुळे त्यांनी ते सहन केले. आता ते शक्य नाही. काल फतवा काढला 2 हजार रुपयांची नोट बंद. काय चाललेय हे? , असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. महिलांनी जपून ठेवलेल्या नोटा आता बँकेत द्या आणि बदलून घ्या, एवढंच राहिलंय, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारचे कान टोचले.
कोणत्या मार्गाने तुम्ही महाराष्ट्राला घेऊन जाताय?
सरकार येतील जातील पण सत्तेचा गैरवापर, मस्ती आणि नशा डोक्यात जाऊ देऊ नका, असा इशारा दिला. मंदिराला ड्रेस कोड लागू करण्याच्या निर्णयावरुन सरकारचे कान टोचले आहेत. ’हाफ पँट घालून दर्शनाला गेल्यास बिघडले काय?’, ’कोणत्या रस्त्याने महाराष्ट्राला घेऊन जाताय?… महागाई, बेरोजगारीवरचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न दिसून येत आहे. काही देवस्थानांनी कमी कपडे घालून मंदिरात यायचे नाही असे सांगितले. अनेक ठिकाणी पोशाखच तसा आहे, त्याला काय करणार ? कोणी गोमूत्र शिपडतंय कोणी काय करत आहे. कोणत्या मार्गाने तुम्ही महाराष्ट्राला घेऊन जाताय. मंदिरा प्रमाणे दर्ग्यातही आपण जातो, असे अजितदादा म्हणाले.
विकास कामाला स्थगिती दिली जातेय!
व्यवसाय चालण्यासाठी कायदा सुव्यवस्था तर चांगला असला पाहिजे.आताच्या राज्यकर्त्यांकडे तसे काही दिसत नाही. भ्रष्टाचार वाढला आहे. राज्याचे आर्थिक शिस्त बिघडली आहे त्याला जबाबदार कोण? तुम्ही काय काय केल हे जनतेला माहित आहे. गद्दार, 50 खोके हे शब्द आता जनतेलाही पटले आहेत. महाविकास काळातील विकास कामांवरची बंदी हायकोर्टाने उठवली तरी हे सुप्रीम कोर्टात गेले. काय कारण आहे?आम्ही काही घरचे काम केलं नाही, जनता सगळे दाखवून देत असते.कर्नाटकच्या जनतेने दाखवून दिले. आमच्या काळात आम्ही काय त्यांची काम बंद केली नव्हती. विकास कामाला स्थगिती दिली जात आहे. करोडो रुपयांची बिलं ट्रेझरीमध्ये थांबून ठेवलेली आहेत. शेतकèयांच्या घरापर्यंत दारापर्यंत कुठलीही मदत पोहोचलेली नाही सरकारने जाहीर केलेला गोष्टींची अंमलबजावणी केलेली नाही. सरकार विरोधात तोच असंतोष जनतेच्या मनामध्ये आहे, असा हल्लाबोल अजितदादा यांनी चढवला.
अशाने पेट्रोल – सिलिंडर दरवाढ कमी होणार आहे का?
भाजपमध्ये अनेक नेते जाणार असल्याचे दावे करण्यात येत आहेत. मात्र असे दावे अनेक वर्ष करण्यात येत आहेत ज्या वेळेस हे दावे खरे ठरतील त्यावेळेस या दाव्यांना महत्त्व ठरेल. महागाई , बेरोजगारी, शेतकèयांचे प्रश्न यांच्यावर दुर्लक्ष करण्यासाठी असे दावे केले जात आहेत. अशा पद्धतीने बातम्या देऊन ते नेमके काय साध्य करतात हे अजूनपर्यंत कळलेले नाही. अशा बातम्यांमुळे पेट्रोल दरवाढ कमी होणार आहे का सिलिंडरच्या किमती कमी होणार आहेत का तरुणांना रोजगार मिळणार आहेत का, आदी प्रश्न पवार यांनी उपस्थित केले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका
दंगल, बलात्कार या सारख्या घटना वाढत आहेत. ज्यांच्या हातात सरकार असते त्यांनी प्रशासनावर एक जरब बसवली पाहिजे . पोलीस खाते ज्यांच्याकडे आहे त्या देवेंद्र फडणवीस यांनी त्या पोलीस खात्यात आदर युक्त दबदबा निर्माण केला पाहिजे. गुन्हेगारांवर कारवाई करणाèया अधिकारी वर्गाला प्रोत्साहन दिल तरच बलात्कारांसारख्या गोष्टी थांबू शकतात. गुन्हेगारी थांबू शकते. सध्या राज्यात दंगली वाढतील असे दबक्या आवाजात बोलले जात आहे. कोणत्याही जाती, धर्म आणि पंथामध्ये दुसèयाचा द्वेष आणि अनादर करावा असे कृत्य करु नये, असे यावेळी त्यांनी आवाहन केले.
सरकारी यंत्रणांचा सूड आणि राजकीय भावनेने वापर नको!
ज्यांची चौकशी चालू आहे त्यांनी ईडीला किंवा त्या यंत्रणाला सहकार्य केले पाहिजे. आणि सरकारी यंत्रणेने सुद्धा द्वेष भावनेने, सूड भावनेने, राजकीय भावनेने त्या यंत्रणाचा वापर करु नये. सरकारकडून ज्या ज्या घोषणा केल्या जात आहेत त्याच्याकडून अंमलबजावणी होत नाही. हे सरकार संविधानिक आहे असं अनेकदा बोलून झालेले आहे. ज्यावेळेस आम्हाला हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट सांगेल की या सरकारला कोणताही अधिकार नाहीत त्यावेळीच हे खरं मानावे लागेल. शेवटी जनतेच्या दारात जेव्हा हे सरकार जाईल आणि जनता जो निर्णय देईल त्याचवेळी हे सरकार संविधानिक आहे का, हे खरे समजले, असे अजितदादा म्हणाले.