Spread the love

महाड,6 एप्रिल
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काहीच दिवसांपूर्वी भाकरी फिरवण्याचे वक्तव्य केले होते. पवारांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघाले. या विधानानंतर काहीच दिवसात शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या आग्रहाखातर पवारांनी त्यांचा राजीनामा मागे घेतला. शरद पवारांचे भाकरीचे वक्तव्य चर्चेत असतानाच त्यांनी आत्मचरित्रामधून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले, त्यावरूनही वाद निर्माण झाले.
शरद पवारांच्या टीकेवर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते, पण महाडमधल्या सभेत उद्धव ठाकरे यांनीही भाकरीचा उल्लेख केला. माझ्यावर टीका केल्यामुळे काहींना भाकरी मिळतेय, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. मला मुख्यमंत्री करण्यासाठी काय केले? कसे सरकार चालवले, हे मला कुठे लिहिण्याची गरज नाही, असा निशाणाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
बारसू प्रकल्पावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला आहे. मी प्रकल्प होऊन देणारच नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसूमध्ये उतरवेन. सगळे लपवून का करताय? मातीची चाचणी करायची असेल तर मातीतल्या लोकांच्या मनाचीही चाचणी करा. लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही? उद्या रिफायनरी आल्यानंतर माझ्या कोकणातल्या बांधवांना कटोरे घेऊन फिरवणार का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
बारसूमध्ये सगळे जागा मालक उपरे आहेत. होय मी पत्र दिलंस, मी खोटं बोलत नाहीये. नाणारची रिफायनरी मी होऊ दिली नाही, पण मला दिल्लीतून फोन यायचे आणि हे गद्दार मला सांगायचे, साहेब मोठा प्रकल्प आहे. मला फसवून पत्र घेतले गेले, तिकडे गाव नाही, असे मला सांगितले. सगळा सिक्वेन्स लागल्यावर मला कळाले, माझे पत्र घेतले आणि हे गद्दार गेले, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.
बारसूमध्ये सर्वत्र पोलीस उतरवले आहेत. एवढा मोठा पोलीस बंदोबस्त चीनविरोधात लावा. केंद्रातील नेभळट त्यांच्यावर काहीच बोलत नाहीये. इकडे माझ्या लोकांवर लाठ्या चालवत आहेत. मी पोलिसांशिवाय जनतेमध्ये उभा राहू शकतो, तर हे का नाही उभं राहून सांगत प्रकल्प चांगला आहे. जमिनी उपèयांच्या घशात घातल्या, कोकणच्या भूमीवर उपèयांचा वरवंटा का चालवताय? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.