
पुलाची शिरोली(प्रतिनिधी)विद्याधर कांबळे
पेठवडगाव ता. हातकणंगले येथील एका तरुणाचे घरातून अपहरण करून त्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वडगाव पोलिस ठाण्यात पुलाची शिरोलीतील सात जणांसह एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की पेठवडगाव येथील ऋत्विक जाधव सोबत प्रशांत उबाळे व त्याचा अन्य एक मित्र २५ मे रोजी शिरोलीतील एका बारमध्ये दारू पित बसले होते. ऋत्विक चा चुलता शिरोलीत राहत असल्याने त्याचे तिकडे नेहमी येणे जाणे होते.त्यामुळे ते एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दारू पीत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर प्रशांत याने रोहित सातपुते यास फोन करून सांगितले की,ऋत्विक ने तुला शिवीगाळ केली आहे,असे सांगून भडकविले. त्यानंतर २६ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रोहित सातपुते व त्याच्या साथीदारांनी ऋत्विक याच्या घरी येऊन त्यांच्या कुटुंबातील भाडेकरूच्या मुलाबाबत चौकशी केली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलगा ऋत्विक यांना धमकावत त्यांचे मोबाईल फोन हिसकावून घेतले. तसेच ऋत्विक जाधव याचे जबरदस्तीने अपहरण करून त्याला वाहनातून शिरोली तसेच सादळे–मादळे ता.करवीर घाट परिसरात नेण्यात आले.
तेथे आरोपींनी ऋत्विक यास जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. त्यानंतर जखमी ऋत्विक यास परत पेठवडगाव येथे सोडून पळ काढला. सद्या ऋत्विक याच्यावरती मिरज येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
याबाबत जखमी ऋत्विक चे वडील रामचंद्र शंकर जाधव (वय ५७, व्यवसाय-व्यापार, रा. बालाजी पार्क, पेठवडगाव, ता. हातकणंगले यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत उबाळे, आदिनाथ नरसिंगे,रोहित शहाजी सातपुते, प्रताप शिवाजी भोरे,अली तानेखान,विशाल कांबळे, अनिकेत कांबळे (सर्व रा. पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) तसेच एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पेठवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.या घटनेमुळे पेठवडगाव व शिरोली परिसरात खळबळ उडाली आहे.
