Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांच्या नोटिशीवर आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांनंतर राज्य सरकारने दिलेल्या प्रतिक्रियेवर टिप्पणी केली. तसेच, त्यांनी कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. ते म्हणाले, ”मी इथेच मरेन परंतु, आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याबाबत सरकार अधिसूचना काढत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही.”

मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून म्हणाले, ”मी मेलो तरी आझाद मैदानातून हटणार नाही. माझं काय व्हायचं ते होऊ देत. मी मेल्यानंतर त्याचे दुष्परिणाम तुम्ही व मराठे बघून घ्या. परंतु, तुम्ही कुठल्याही थराला गेलात तर मी सुद्धा कुठल्याही टोकाला जायला तयार आहे. मी आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करण्याबाबतचा शासन निर्णय घेतल्याशिवाय मागे हटायला तयार नाही हे लक्षात ठेवा. मराठे काय असतात हे 350 वर्षांनंतर पुन्हा एकदा बघायचं असेल तर त्याला माझा नाईलाज आहे. कारण मी मरेपर्यंत मागे हटणार नाही हा माझा निर्धार आहे.”

न्यायालयाचा आदेश पाळा : मनोज जरांगे

मराठा आरक्षणासाठी लढत असलेले मनोज जरांगे सर्व आंदोलकांना व मराठा समाजाला उद्देशून म्हणाले, ”मी सर्व मराठ्यांना शेवटचं सांगतो, तुमची वाहनं पोलीस सांगतील त्या ठिकाणी उभी करा आणि बस-ट्रेनने प्रवास करा. हवं तर या मैदानात तुमची वाहनं उभी करा, वाशीला (नवी मुंबई) जाऊन तिथे वाहनं उभी करा आणि ट्रेनने इथे या. कारण न्यायालयाने आपल्याला शांत राहायला, शहराची व्यवस्था टिकवून ठेवायला सांगितलं आहे.”

मनोज जरांगे पाटील म्हणाले, ”मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ठासून सांगतो की मी मरेपर्यंत मुंबई सोडणार नाही. तुम्ही काही गडबड करू नका. न्यायालयाच्या नियमांचं पालन करा. न्यायदेवता गोरगरिबांचा आधार आहे. ती आपली साथ देईल. न्यायदेवता गोरगरिबांच्या डोळ्यांमधील अश्रू पुसेल असा मला विश्वास आहे. तिथे आपल्यावर अन्याय होणार नाही.”