मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मंगळवारी दुपारपर्यंत मुंबईच्या सीएसएमटी परिसरातील आंदोलकांना बाहेर काढावं, असंही कोर्टानं म्हटलं. यानंतर मुंबई पोलीस ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. त्यांनी मनोज जरांगे यांना नोटीस बजावली आहे. अशातच आता मनोज जरांगे पाटील आझाद मैदान सोडणार का? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता जरांगे पाटील यांनी मुंबई पोलिसांच्या नोटीसला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सांगून अटक केली तर तो घातक विषय असणार आहे. आम्ही शांतच आहे, आम्हाला शांतच राहू द्या. आमच्या पोरांना हात लावला तर तुमच्याही नेत्यांना महाराष्ट्रात येयचं आहे, असं म्हणत जरांगे यांनी सरकारला इशारा दिला आहे. आणखी मराठ्यांनी यायची सुरुवात झाली नाही. शनिवार रविवार मराठे मुंबईत आले मग सोमवारचं आंदोलन खूप छान असणार आहे. ती वेळ मराठ्यांवर येऊ देऊ नका. आम्ही मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी ठणकावून सांगितलं आहे.
मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही. त्याचे दुष्परिणाम तुम्ही जाणं आणि मराठे जाणं. कोणत्याही थरावर गेले तरी देखील मी हटणार नाही. मराठे काय असतात हे 350 वर्षानंतर पाहायचं असेल तर तुम्ही पाहा. आझाद मैदानातून हुसकून लावलं तर सरकारला महागात पडेल. राहिली विषय सरकारचा, सरकारने न्यायलयात जाऊन आमच्यावर अन्याय केला तरी पुन्हा सांगतो, फडणवीसांना सांगतो, सातारा आणि हैदराबाद गॅजेच पालन झाल्याशिवाय मुंबईत सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आम्ही कुठेही कायद्याचं उल्लंघन केलं नाही, शांततेत उपोषण केलं आहे. रस्त्यावर एकसुद्धा गाडी आमच्या पोरांनी गाडी ठेवली नाही. न्यायदेवतेच्या एका शब्दावर आम्ही मुंबई रिकामी केली. यापेक्षा काय वेगळं केलं पाहिजे. दुसरे लोक हे देखील पाळत नाही. पुढंही न्यायदेवता सांगेल तर करत राहू नियमाचं पालन करुन आंदोलन सुरू राहणार, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
