मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांची अनेक राजकीय नेते भेट घेत आहेत. काल रविवारी (दि. 31) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुप्रिया सुळे निघत असताना मराठा आंदोलकांनी त्यांना घेराव घातला होता. तसेच सुप्रिया सुळे यांची गाडी अडवत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले. आता यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, त्यांचा एवढा तर हक्क आहेच ना. एवढ्या मोठ्या आंदोलनात तरुण मुले असतात, त्यांच्या मनात काही गोष्टी असतात. मी एक लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे सर्वांच्या भावनांचा आदर मी केलाच पाहिजे. एखाद्या मुलाच्या काही वेदना असतील तर त्या ऐकून घेणे, समजून घेणे आणि नुसते समजून घेणे नाही तर त्यातून मार्ग काढणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तिथे फार काही झालेले नाही. एखाद्या मुलाने हट्ट केला तर त्यात गैर काय? अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
मनोज जरांगेंचे मराठा आंदोलकांना आवाहन
दरम्यान, सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांनी घेराव घातल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना आवाहन केले. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, कोणताही नेता आला तरी त्याला ताण देऊ नका. आपल्या व्यासपीठावर आलेला आपला दुश्मन जरी असला तरी त्याला सन्मान द्यायला शिका. गोंधळ घालणार असाल तर कोणी येणार नाही, असे त्यांनी म्हटले. तर सहन होतंय तोवर सन्मान करा, जेव्हा आरक्षण मिळणार नाही हे स्पष्ट होईल तेव्हा बघू काय करायचं ते असा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
