यड्राव / महान कार्य वृत्तसेवा
यड्राव (ता. शिरोळ) येथे गणेश चतुर्थीनंतर गौरी आवाहनाच्या पारंपरिक सोहळ्यात गंगागौरी मुखवट्यांची स्थापना मोठ्या भक्तिभावाने करण्यात आली. याप्रसंगी गावातील वातावरण भक्तिमय झाले असून घराघरात आनंद आणि उत्साहाचे स्वर दुमदुमले आहेत.
लक्ष्मण निर्मळ यांच्या घरी यंदा गंगागौरी मुखवट्यांची स्थापना मोठ्या दिमाखात झाली. मुखवट्यांना आकर्षक वेशभूषा करून सजवण्यात आले. अंजना निर्मळ, तेजस्विनी निर्मळ, प्रियंका निर्मळ आणि अजुना निर्मळ यांनी उत्साहाने हा सर्व सोहळा पारंपरिक पद्धतीने साकारला. मुखवट्यांना पारंपरिक साडी नेसवून, दागदागिने घालून त्यांना शोभिवंत रूप दिले गेले. महिलांनी एकजुटीने हा सोहळा साजरा केल्याने घरातील आनंद द्विगुणित झाला आहे.
गंगागौरीसाठी खास ५६ भोग प्रसाद अर्पण करण्यात आला. घरातील प्रत्येक सदस्याने भक्तिभावाने त्यात सहभाग नोंदवला. लाडू, पुरणपोळी, खीर, मोदक, पेढा, बर्फी अशा अनेक पदार्थांच्या प्रसादाने गंगागौरी पूजनाला विशेष पारंपरिकता दिसून आली. यावेळी घरात तसेच परिसरात स्तोत्रपठण, महिलांची पारंपरिक गाणी यामुळे वातावरण अधिकच भक्तीमय झाले आहे.
गौरीपूजन हा उत्सव स्त्रीशक्तीचा, समृद्धीचा आणि मंगल कार्याचा प्रतीक मानला जातो. गंगागौरी मुखवट्यांच्या सौंदर्याचा आणि भक्तिभावाने सजवलेल्या प्रसादाचा लाभ घेत आहेत. गणेशोत्सवाच्या धामधुमीत गंगागौरी पूजनामुळे घराघरात भक्ती, श्रद्धा आणि आनंदाची अनोखी अनुभूती मिळाली. निर्मळ परिवाराने पारंपरिक रितीने केलेली ही भक्तीभावाची सेवा संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरली आहे.
