मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाने आता राज्यातील राजकारण ढवळून निघाल्याचं पहायला मिळतंय. राज्यातील अनेक नेत्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरू केल्या असून आता राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असल्याचं समोर येत आहे. अशातच आता पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
न्याय आणि भाकरीही मिळाली पाहिजे
मनोज जरांगे पाटलांची अपेक्षा माफक असल्याचे सांगत, सरकारने त्यांची मागणी त्वरित सोडवावी, असे धंगेकर म्हणाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”मी आमदार असतानाही हीच बाजू मांडली होती. सर्वसामान्य लोकांना शिक्षण आणि नोकरीची मोठी समस्या भेडसावत आहे. त्यामुळे सर्वांना न्याय मिळाला पाहिजे आणि भाकरीही मिळाली पाहिजे.”
एक महिला मदतीसाठी आली होती – धंगेकर
मराठा समाज म्हणजे श्रीमंत असा समज अनेकांमध्ये आहे, पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही, असे धंगेकर यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यासारख्या भागातील मराठा समाज पिचलेला आहे. मराठा समाजाची एक महिला त्यांच्याकडे मदतीसाठी आली होती, तिची फी त्यांनी स्वत: भरल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. याआधीच्या सरकारमधील नेत्यांनी मराठा आणि इतर समाजांना आरक्षणाचे आश्वासन दिलं होतं. आता ते सर्व नेते सत्तेत आहेत, त्यामुळे त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत, असे म्हणत धंगेकर यांनी सरकारवर ‘घरचा आहेर’ दिला.
धंगेकरांचा सरकारला घरचा आहेर
दरम्यान, ”दहा वर्षांपूर्वी जे नेते भाषणातून आरक्षणाबद्दल बोलले होते, ते आता त्यांनी दिले पाहिजे. धनगर समाजाला आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण देण्याचे आश्वासन दिलं होतं, पण ते दिलं की नाही हे मला माहित नाही,” असं म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. क्रांती करायला निघालेले ते लोक आहेत. त्यांना काही मिळो वा न मिळो, पण ते आरक्षण घेऊनच येणार, असा विश्वास देखील धंगेकर यांनी व्यक्त केला.
