Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानवर तीन दिवसांपासून उपोषण सुरु आहे. या उपोषणासाठी राज्यभरातून मराठा आंदोलक मोठ्या संख्येने मुंबईत दाखल झाले आहेत. याच दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. अमित शाह आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्‌‍यावर मुंबईत बैठक पडली. तर एकनाथ शिंदे हे अमित शाह यांच्या भेटीनंतर आपल्या गावी दरे गाव येथे गेल्याचे पाहायला मिळाले. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर देखील संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय. 

संजय राऊत म्हणाले की, मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव आले आहेत. त्यांचे नेते जरांगे पाटील आझाद मैदानावर भर पावसात उपोषणाला बसले आहेत. हजारोंच्या संख्येने मराठा बांधव इथे आल्याने मुंबईतला बराचसा भाग विस्कळीत झाला आहे. काल इथे देशाचे गृहमंत्री अमित शाह येऊन गेले. त्यांच्यासोबत भाजपचं सगळं लटांबर होतं.  उपमुख्यमंत्री जे दरेगावला गेले आहेत ते देखील त्यांचं शेपूट घेऊन त्यांच्यासोबत फिरत होते. 

अमित शाह घटनेत बदल करू शकतात

इतका मोठा गंभीर प्रश्न मुंबईत सुरू आहे. हजारो-लाखो लोक मुंबईत येत आहेत आणि तो विषय केंद्राशी संबंधित आहे. आमची अपेक्षा होती की, देशाचे गृहमंत्री आझाद मैदानावर जातील, त्यांना दिलासा देतील, तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील आणि हा विषय जो ऐन गणेशोत्सवात निर्माण झालेला आहे तो शांत करतील. जे गृहमंत्री काश्मीरचा प्रश्न सोडवू शकतात, 370 कलम हटवू शकतात, त्यासाठी घटनेत बदल करू शकतात. ते गृहमंत्री मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सुद्धा त्या घटनेत बदल करू शकतात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

मुंबईचा महापौर उपरा होऊ दे

संजय राऊत पुढे म्हणाले की, त्यांनी 370 कलम हटवण्याचं श्रेय घेतलं, त्यांना हे देखील श्रेय घेता आलं असतं. पण त्यांनी ते केलं नाही, मग त्यांनी मुंबईत येऊन काय केलं?  मुंबईत येऊन त्यांनी एवढेच केलं. भारतीय जनता पक्षाच्या लटांबराला सांगितलं की, मुंबईचा महापौर भाजपचाच व्हायला पाहिजे. म्हणजे गुजराती व्हायला पाहिजे, मराठी व्हायला पाहिजे, हे त्यांनी काल सांगितलं.  गृहमंत्री लालबागच्या राजाकडे काय प्रार्थना करतात की मुंबईचा महापौर उपरा होऊ दे, भाजपचा होऊ द्या. म्हणजे उपरा होऊ द्या, बाहेरचा होऊ द्या.  पण त्यांना मराठा बांधवांकडे जाऊन त्यांचं दु:ख ऐकण्याचा वेळ नव्हता. मुंबईत मराठी माणसाचा पराभव होऊ द्या आणि ही मुंबई आम्हाला मिळू द्या, यासाठीच ते दर्शनाला गेले, असे देखील त्यांनी म्हटले. 

अमित शाह यांनी जे केलं ते अत्यंत क्रूर

ज्या संख्येने मराठी बांधव मुंबईत जमत आहेत आम्ही त्यांचे स्वागत करतो. मराठीची ताकद काय आहे ते देशाला कळू द्या, आम्हाला त्यांचा अजिबात त्रास होत नाहीये. उद्धव ठाकरे यांनी काल तमाम शिवसैनिकांना आवाहन केलं आहे की, हे सरकार सुविधा पुरवण्यात मागेपुढे पाहत आहे. त्यामुळे त्यांना अत्यावश्यक सुविधा, अन्न, पाणी, निवारा जे जे करणं शक्य आहे ती मदत आपण करूया. या महाराष्ट्राच्या बाबतीत, मराठी माणसाच्या बाबतीत अमित शाह यांनी जे केलं ते अत्यंत क्रूर आहे. त्यांना तिथे जाता आलं असतं. त्या संदर्भात त्यांना एक बैठक घेता आली असती. ते तोडगा काढून गेले असते. त्यांच्या मागे भाजपचं लटांबर फिरत होतं. जे दरे गावात जाऊन बसले आहेत. देवेंद्र फडणवीस हे कसले मराठे? हे सर्व लोक मराठी माणसाला कलंक आहेत.

फडणवीस, शाहांचे सरकार मराठी लोकांना मारायलाच निघालेत

काल सरकारच्या वतीने न्यायमूर्ती शिंदे वगैरे जरांगेंना भेटले. त्यांच्यात चर्चा सुरू आहे. ही चर्चा अजून किती काळ चालेल हे  सांगता येत नाही. तोपर्यंत हे हजारो आंदोलक मुंबईत राहतील. ही मुंबई आपली आहे हे समजून त्यांनी मुंबईत थांबायला पाहिजे. ही मुंबई मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची राजधानी आहे. या भावनेने सर्व मराठी बांधवांनी इथे राहायला पाहिजे.  फडणवीस आणि अमित शाह यांचे सरकार मराठी लोकांना मारायलाच निघालेले आहे. हे बोलतात एक करतात दुसरं. मराठी माणसाला संपवण्यासाठी त्यांचं सरकार इथे आलेले आहे. सरकारमध्ये एकमेकांना संपवण्याच्या भानगडीत मराठी माणसाला खतम करण्यासाठी हे निघाले आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी केला.

उदयनराजे, शिवेंद्रराजेंनी जरांगे पाटलांच्या मंडपात उपोषणाला बसलं पाहिजे

संजय राऊत पुढे म्हणाले की, अमित शाहांच्या मागे शेपटी हलवत फिरताना एकनाथ शिंदे यांना लाज वाटायला पाहिजे होती. जो माणूस मुंबईतून मराठी माणूस संपवायला निघालेला आहे. जो मराठी माणसाच्या प्रश्नांकडे ढुंकून सुद्धा पाहायला तयार नाही. तुम्ही स्वत:ला कसले मराठा समजतात? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका. छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत मंडपात जाऊन उपोषणाला बसायला पाहिजे. पण हे सगळे लोक भारतीय जनता पक्षाचे हस्तक आहेत, हे सगळे भाजपच्या दबावाखाली आहेत. हे या राज्याचं दुर्दैव आहे, अशी टीका त्यांनी यावेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर केली.