मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू क्रिकेट संघाचे चाहते 2025 हे वर्ष कधीच विसरू शकणार नाहीत. गेल्या 18 वर्षांपासून क्रिकेट चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आणि विराट कोहलीचं आयपीएल ट्रॉफीचं स्वप्न पूर्ण झालं. त्यानंतर 4 जूनला बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयाचा जल्लोष करण्यात आला. मैदानात विजयाचा जल्लोष सुरू होता. तर मैदानाबाहेर चेंगराचेंगरीत क्रिकेट चाहत्यांना आपला जीव गमवावा लागला. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ”रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू कुटुंबातील 11 सदस्यांना आम्ही गमावलं. ते आमचाच एक भाग होते. आमच्या शहराला, आमच्या संघाला खास बनवणाऱ्या गौष्टींपैकी ते एक होते. त्यांची अनुपस्थिती प्रत्येकाच्या आठवणीत कायम राहिल.”
तसेच त्यांनी पुढे लिहिले की, ”आम्ही कितीही मदत केली, तरीदेखील त्यांनी मागे सोडलेली पोकळी कधीच भरून काढता येणार नाही. पण पहिल्या टप्प्यात आणि आदर म्हणून आरसीबीने त्यांच्या कुटुंबासाठी 25 लाखांची मदत जाहीर केली आहे. ही केवळ आर्थिक मदत नसून एकता आणि सातत्यपूर्ण काळजीचे आश्वासन आहे.”
काही दिवसांपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते की, ”शांतता ही आमची अनुपस्थिती नव्हती. हे दु:ख होतं. हे ठिकाण एकेकाळी ऊर्जा, आठवणी आणि त्यांच्या आनंदी क्षणांनी भरलेलं होतं. पण 4 जूनला सर्व काही बदललं. त्या दिवशी आमचं मन तुटलं आणि त्यानंतरची शांतता हीच आमचं दु:ख व्यक्त करण्याची पद्धत ठरली.”
आयपीएल 2025 स्पर्धेतील अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला होता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने बाजी मारत पहिल्यादांच आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचा मान पटकावला होता.
