Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवून देण्यासाठी जरांगे मुंबईच्या दिशेनं येत आहे. हजारो मराठा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ते बुधवारी जालन्यातील अंतरवाली सराटीतून निघाली. त्यांचा पहिला मुक्काम जुन्नर याठिकाणी होता. आता मराठा समाजाचं भगवं वादळ मुंबईच्या दिशेनं रवाना झालं आहे.

दरम्यान, मराठा समाजाबाबत एक दु:खद घटना समोर आली आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका आंदोलकाचा जुन्नरमध्ये मृत्यू झाला आहे. आंदोलकाच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर मनोज जरांगे यांच्यासह संपूर्ण मराठा आंदोलकांमध्ये दु:खाची लाट पसरली. याबाबत जरांगेंनी देखील संवेदना व्यक्त केल्या आहेत. मराठा आरक्षणाचा लढा मुंबईच्या दिशेनं जाताना ही दुर्दैवी घटना घडल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सतीश देशमुख असं मृत पावलेल्या मराठा आंदोलकाचं नाव आहे. ते बीडच्या केज तालुक्यातील वरडगाव येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. मराठा आंदोलक जुन्नरमध्ये आले असता, सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला. या घटनेनंतर त्यांना तातडीने जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी सतीश देशमुख यांना मृत घोषित केलं. या सगळ्या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी दु:ख व्यक्त केलं. मराठा आरक्षणाचा लढा मुंबईच्या दिशेनं जाताना ही दुर्दैवी घटना घडल्याचं म्हटलं. सतीश भैय्याचं आताच बलिदान गेलंय. हे बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे आपण संयमाने आंदोलनाची लढाई लढू. आपण टप्प्याटप्प्याने आरक्षण घेऊ, असंही जरांगे यावेळी म्हणाले. सरकारने आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी केवळ एक दिवसाची परवानगी दिली आहे. यावर प्रतिक्रिया देताना जरांगे यांनी ही अट आपल्या कदापि मान्य नाही, अशी भूमिका घेतली आहे.