ठाकरेंच्या शिवसेनेकडून खूप काही शिकण्यासारखं ; खासदार विशाल पाटलांकडून कौतुक
मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप लोकांनी सोडून देखील मुंबईमध्ये शिवसेनेला भरपूर मते पडतात. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे असे म्हणत खासदार विशाल पाटील यांनी ठाकरेंच्या मुंबईमधील शिवसेनेच्या सेवाभावी कार्यपद्धतीचे कौतुक केले. काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार विशाल पाटील यांनी हे विधान केले. लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारामुळेच विशाल पाटील यांना अपक्ष खासदारकीची निवडणूक लढवावी लागली होती. त्यामुळे खासदार विशाल पाटील यांच्या या विधानाची राजकीय वतुर्ळात बरीच चर्चा होत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघाच्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने खासदार विशाल पाटील यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडीतून विरोध करत स्वत:च्या पक्षाकडे उमेदवारी घेतली होती. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना चित्रपट करत विशाल पाटील पहिल्यांदाच खासदारकीच्या निवडणुकीत विजयी झाले होते.
सांगलीच्या जागेवरून वाद टोकाला
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून चांगलीच वादावादी निर्माण झाली होती. त्यामुळे महाविकास आघाडी फुटते की काय? अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. कोणत्याही स्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगलीची जागा सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे खासदार विशाल पाटील यांना अपक्ष उमेदवारी लढवावी लागली होती. त्यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी यांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली होती. त्यांनी दिल्लीपर्यंत वाऱ्या केल्या होत्या. त्यामुळे विश्वजीत कदम, विशाल पाटील विरुद्ध संजय राऊत असा चांगलाच सामना रंगला होता. त्यामुळे वसंतदादा पाटील घराण्यात आणि शिवसेनेत चांगलेच मतभेद निर्माण झाले होते. मात्र, आता जाहीरपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे कौतुक करत विशाल पाटील यांनी कटूता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे सांगली लोकसभेची निवडणूक तिरंगी झाली. या तिरंगी लढतीत सांगलीत मजबूत संघटन नसल्याने आणि चंद्रहार पाटील यांच्यासारख्या नवख्या उमेदवारामुळे शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर फेकली गेली. विशाल पाटील यांनी संजय पाटील यांची हॅट्ट्रिक रोखत अपक्ष लढतीत विजय खेचून आणला होता. या विजयात विश्वजित कदम यांची सुरुवातीपासून घेतलेली भूमिका सुद्धा निर्णायक ठरली.
