Spread the love

गडचिरोली / महान कार्य वृत्तसेवा

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक पुरुष आणि तीन महिला नक्षलवादी आहे. घटनास्थळावरुन सुरक्षा पथकाने एक एसएलआर रायफल, दोन इन्सास रायफल आणि एक .303 रायफल असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. चकमक अद्याप सुरू आहे.

गडचिरोली-नारायणपूर सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात गडचिरोली विभागाचे गट्टा दलम, कंपनी क्रमांक दहा आणि इतर माओवादी नक्षलवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेने सुरक्षा पथकास दिली. यानंतर अपर पोलीस अधीक्षक अभियान एम. रमेश यांच्या नेतृत्वाखाली सी – 60 ची 19 पथके आणि सीआरपीएफ जलद कृती दलाची दोन पथके जंगल परिसरात रवाना झाली. मुसळधार पावसामुळे सुरक्षा पथकाला नक्षलवादी लपून बसलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दोन दिवस लागले. पण सर्व अडचणींवर मात करत सुरक्षा पथकाने जंगलात शोध मोहीम हाती घेतली. सुरक्षा पथकाचे जवान बघून नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला आणि चकमक झाली. या चकमकीत चार जहाल नक्षलवादी ठार झाले. चकमक अद्याप सुरू आहे. जंगलात लपलेल्या इतर नक्षलवाद्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.