इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
सभासद आणि कर्मचार्यांच्या विश्वासाच्या बळावरच संस्थेची वाटचाल सुरु आहे. बदलत्या काळानुरुप अत्याधुनिक मशिनरी बसवाव्या लागणार असून त्या दृष्टीने तयारी सुरु आहे. ही संस्था कदापि बंद होणार नाही आणि बंद पडू देणार नाही, असा विश्वास दि इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिल्स (आयको) चे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी व्यक्त केला.
दि इचलकरंजी को-ऑप. स्पिनिंग मिल्सची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मिलच्या कार्यस्थळी खेळीमेळीत पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरुन श्री. आवाडे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध अडचणी व समस्यांचा सामना करत सहकारी सूत गिरण्या चालविणे कठीण बनले आहे. काळानुरुप नवनवीन तंत्रज्ञान येत असून त्याचा स्विकार करण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सूत गिरणीने आता आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर वाढत्या वीजदराला पर्याय म्हणून सौरऊर्जा प्रकल्प उभारावा लागणार आहे. शिवाय मिलच्या जागेतच गारमेंट युनिट वा एअरजेट लुमचे युनिट सुरु करण्याचा मानस असल्याचेही सांगितले. तसेच कामगारांची कोणत्याही प्रकारची देणी प्रलंबित राहणार नाहीत त्यामुळे कामगारांनी चिंता करु नये, असेही ते म्हणाले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ज्ञात-अज्ञात व्यक्तींना श्रध्दांजलीचा ठराव बोर्ड सेक्रेटरी चंद्रशेखर स्वामी यांनी मांडला. संस्थेचे प्रभारी कार्यकारी संचालक ए. बी. कोतवाल यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजूरी दिली. शेवटी संस्थेचे व्हा. चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रविण केसरे यांनी केले.
सभेस सौ.वैशाली आवाडे, आदित्य आवाडे, दिया आवाडे, संचालक सर्वश्री अहमद मुजावर, एम. के. कांबळे, विठ्ठल सुर्वे, संभाजीराव खोचरे, सौ. अंजली बावणे, श्रीमती बिसमिल्लाबी मुल्लाणी, माधव माळकर, गजानन कडोलकर, राजाराम सांगावकर, चिफ मॅनेजर आर. आर. पाटील आदींसह सभासद उपस्थित होते.
