अहिल्यानगर / महान कार्य वृत्तसेवा
रविवारी पहाटे तीनच्या सुमारास नगरमध्ये काही समाजकंठकांनी सामाजिक शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला आहे. अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान ते पटवर्धन चौक दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या घोडे पीर दर्ग्याला काही समाजकंटकांनी पाडण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. मागील दोन दिवसांपासून या दर्ग्याच्या जागेवरून दोन गटांमध्ये मतभेद सुरू होते. एका गटाकडून संबंधित दर्गा हटवण्याची मागणी केली जात आहे. तर दुसऱ्या गटाकडून याला विरोध केला जात आहे. दरम्यान, सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास काही जणांनी हा दर्गा पाडण्याचा प्रयत्न केला.
हा प्रकार घडल्यानंतर दर्गा परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच घटनेची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या निर्देशानुसार आज पहाटेपासून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी. पोलिस तपासानुसार, काही समाजकंटक जाणीवपूर्वक असे प्रकार घडवून आणून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक ती पाऊले उचलत आहे.
