Spread the love

कुशीनगर / महान कार्य वृत्तसेवा

कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू प्रा. हरेराम त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नी बदामी त्रिपाठी यांचा आज (शनिवार) पहाटे झालेल्या रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना उत्तर प्रदेशातील कुशीनगरमधील मऊ परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हरेराम त्रिपाठी हे आपल्या कुटुंबीयांसह त्यांच्या मूळ गावी जात होते. ते रामटेकवरून काल रात्री सहा वाजता निघाले होते आणि सकाळी सहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, विद्यापीठात शोककळा पसरली आहे.

रस्ते अपघातात कुलगुरूंसह पत्नीचाही मृत्यू 

प्रा. हरेराम त्रिपाठी हे संस्कृत साहित्यातील मोठे विद्वान आणि साहित्यिक म्हणून ओळखले जात होते. कालिदास संस्कृत विद्यापीठात त्यांनी अनेक शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबविले होते. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये विद्यापीठाच्या विस्तारासाठी ते मोठ्या प्रमाणावर काम करत होते. पुढील काळात विद्यापीठाचा व्याप वाढवण्यासाठी त्यांनी अनेक योजना आखल्या होत्या. मात्र त्यांच्या आकस्मिक निधनामुळे हे सर्व प्रयत्न अर्धवट राहिले आहेत.

या घटनेमुळे कालिदास विद्यापीठात मोठे नुकसान झाल्याचे मानले जात आहे. प्रा. त्रिपाठी यांच्या जाण्याने केवळ विद्यापीठ नव्हे तर संपूर्ण संस्कृत वायय जगतातील एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना शैक्षणिक क्षेत्रात ही हानी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मृतदेह स्थानिक रुग्णालयात हलविण्यात आला असून, पोलिसांनी अपघाताबाबत तपास सुरू केला आहे.

संस्कृत साहित्य आणि तत्त्वज्ञान क्षेत्रातील मोठे नाव

प्रा. हरेराम त्रिपाठी यांचा जन्म उत्तर प्रदेशातील देवरिया (कुशीनगर) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षणही देवरियामध्येच झाले. 1986 मध्ये त्यांनी संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी बनारस गाठले. त्यांनी रामाचार्य संस्कृत विद्यापीठातून उत्तर माध्यम परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून त्यांनी शास्त्री (पदवी), आचार्य (पदव्युत्तर) आणि पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्ण केले.

1986 मध्ये न्यायशास्त्रातील प्रख्यात विद्वान प्रा. वशिष्ठ त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी पदवी मिळवली. 1993 मध्ये त्यांनी राष्ट्रीय संस्कृत संस्थान (रणवीर कॅम्प, जम्मू) येथे संशोधन सहाय्यक म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. काही महिन्यांनी त्यांची श्री लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठात तत्वज्ञान विभागात नियुक्ती झाली. 2009 मध्ये ते सर्वदर्शन विभागाचे प्राध्यापक झाले.

संस्कृत साहित्य आणि तत्त्वज्ञान क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. 2003 मध्ये त्यांना उत्तर प्रदेश संस्कृत संस्थेकडून महर्षी बद्रायन राष्ट्रपती पुरस्कार देण्यात आला. तसेच शंकर वेदांत, पाणिनी आणि इतर क्षेत्रातील विशिष्ट पुरस्कारही त्यांनी मिळवले. प्रा. त्रिपाठी यांनी आतापर्यंत 30 हून अधिक ग्रंथांचे लेखन आणि संपादन केले आहे.