Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या संयुक्त उत्कर्ष पॅनेलचा दारूण पराभव झाला. ठाकरे बंधूच्या पॅनेलमधील सर्वच्या सर्व 21 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. तर भाजपाचे प्रसाद लाड आणि शशांक राव यांच्या पॅनेलचा मोठा विजय झाला. आज राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना निवडणुकीच्या निकालाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी एका वाक्यात हा विषय संपवला.

दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि.ची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी (18 ऑगस्ट) पार पडली. भर पावसात कामगारांनी निवडणुकीला चांगला प्रतिसाद दिले त्यामुळे 83 टक्के मतदान झाले. बेस्ट उपक्रमाची सर्व आगरे आणि बेस्टची कार्यालये अशा 35 केंद्रावर ही निवडणूक पार पडली. पतपेढीच्या 15,123 सभासदांपैकी 12,656 सभासदांनी मतदान केले.

मंगळवारी निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत ठाकरे बंधुंच्या पॅनलचा एकही उमेदवार जिंकून येऊ शकला नाही. ही निवडणूक म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीची रंगीत तालीमच मानली जात होती. मात्र ठाकरे बंधूंच्या पॅनेलचा पराभव झाल्यानंतर सत्ताधारी महायुतीकडून शिवसेनेवर (ठाकरे) जोरदार टीका करण्यात आली.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुंबईतील वाहतूक समस्येबाबत काही सूचना मांडल्या. त्यांनी काय सादरीकरण केले, याची माहिती पत्रकारांना दिली. यावेळी त्यांना बेस्ट निवडणुकीचा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे म्हणाले, ”मी याबाबत वाचले. काय आहे ते?” राज ठाकरे पुढे म्हणाले, मला या विषयासंदर्भात काहीच माहिती नाही. या अशा निवडणुका स्थानिक पातळीवर होत असतात. त्याचा माझ्याशी काहीही संबंध नाही. या छोट्या गोष्टी आहेत. माध्यमांनी उगाच हा विषय मोठा केला.