Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

मुंबईतील मरोळ येथे उभारण्यात येत असलेले मच्छी मार्केट सर्व सोयींनी युक्त आणि सुसज्ज असावे, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्रालयात मरोळ मच्छी मार्केट संदर्भात बैठक झाली. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यव्यवसाय, आयुक्त किशोर तावडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मच्छी मार्केट उभारण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी असे सांगून मंत्री राणे म्हणाले की, निधी मंजुरीसह इतर सर्व मंजुरी प्रक्रिया नोव्हेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात. या मार्केटच्या ठिकाणी कोळी भवन, कम्युनिटी हॉलही उभारण्यात यावा. तसेच यानंतर पुणे आणि इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये मच्छी मार्केट उभारण्याचे प्रस्ताव तयार करावेत, असे निर्देशही मंत्री नितेश राणे यांनी दिले.

तळघरासह चार मजले असलेल्या या मार्केटमध्ये वाहन पार्किंग, लोडिंग, अनलोडिंग डेक, सुक्या मासळीचा बाजार, बर्फ कारखाना, प्रसाधनगृह, उच्च दर्जाचे मासळी बाजार, कोळी भवन, उपाहारगृह, शीतगृह, प्रशिक्षण हॉल यांचा समावेश असणार आहे.