Spread the love

मुंबई / महान कार्य वृत्तसेवा

वाद-विवादांच्या भोवऱ्यात सापडलेला आशिया चषक अखेर येत्या 9 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठीचा 15 सदस्यीय भारतीय संघ आज, 19 ऑगस्टला जाहीर केला जाणार आहे. एवढंच नव्हे, तर आजच वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ देखील जाहीर होणार आहे. त्यामुळे आजचा दिवस भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

मंगळवारी दुपारी मुंबईतील भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यालयात सभा झाल्यानंतर याची घोषणा केली जाईल, जिथे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर पत्रकार परिषदेत टीम इंडियाच्या संघाची घोषणा करतील. त्याचबरोबर महिलांच्या वनडे विश्वचषकासाठी देखील आज संघाची घोषणा करण्यात येणार आहे.

भारताचा टी-20 कर्णधार मिटिंगसाठी बीसीसीआय ऑफिसमध्ये दाखल

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी असतानाही भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव वेळेआधीच बीसीसीआय ऑफिसमध्ये दाखल झाला आहे. आशिया चषक 2025 साठी भारताच्या संघ निवडीची बैठक बीसीसीआय ऑफिसमध्ये होणार आहे.

निवड समितीच्या पत्रकार परिषदेला उशिरा सुरूवात होणार

मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसाचा परिणाम आजच्या बीसीसीआयच्या बैठकीवर देखील झाला आहे. बीसीसीआयने दिलेल्या अपडेटनुसार, मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे आज संघ निवडीची घोषणा लांबणीवर पडू शकते.

महिला वनडे वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची आज घोषणा

आशिया चषकानंतर 30 सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक 2025 साठी घोषणा करणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक 12 वर्षांनी भारतात होणार आहे. यापूर्वी भारताने 2013 मध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी भारत गट टप्प्यातच बाहेर पडला होता. भारतात होणाऱ्या या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचे सामने श्रीलंकेत खेळवले जातील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया विश्वचषकासाठी प्रबळ दावेदार बनू शकते.

स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांची संघात निवड होईल हे जवळजवळ निश्चित आहे. याचबरोबर गोलंदाजीत आणि मधल्या फळीत कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार यावर सर्वांच्या नजरा आहेत. 19 ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या निवड बैठकीनंतर विश्वचषकासाठी अंतिम संघ जाहीर केला जाईल.